गर्भपाताच्या गोळ्यांमुळे युवतीचा झाला मृत्यू. गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्भपाताच्या गोळ्यांमुळे युवतीचा झाला मृत्यू. गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील एका युवतीसोबत (वय 21) प्रेमाचा बहाणा करीत आधीच दोन लग्न केलेल्या व्यक्तीने त्या मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केला.

सासूरवाडीतील मुक्कामावरून दाम्पत्यात वाद… पत्नीचा मृत्यु
महापौरपदासाठी शिवसेनेच्या शेंडगे रिंगणात दाखल ; उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा आज अर्ज येणार
प्रा. तुषार एकनाथ ढोणे यांना पीएच.डी.पदवी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील एका युवतीसोबत (वय 21) प्रेमाचा बहाणा करीत आधीच दोन लग्न केलेल्या व्यक्तीने त्या मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केला. यातून ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्याने त्या खाल्ल्यावर संबंधित मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये सईद ताहेर बेग (वय 33 वर्षे, रा.संजयनगर, काटवन खंडोबा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित मुलीचे कुटुंब हे माळीवाडा परिसरामध्ये काही वर्षापासून राहत होते. त्यांच्या कुटुंबांमधील पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होत होती. घरात नेहमीच भांडण होत असल्याने पत्नी तिच्या चुलत्याच्या सांगण्यावरून सिद्धार्थनगर येथे राहायला गेली होती. दीड वर्षांपूर्वी मुलगी व तिचा प्रियकर सईद ताहेर बेग हे मुलीच्या आईच्या घरी गेले. सईद माझा प्रियकर असून आम्ही लग्न करणार आहे, असे मुलीने आईला सांगितले. पण, गेल्या 10 ते 15 दिवसापासून मुलगी प्रचंड तणावाखाली असल्याने मुलीच्या आईने विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने सांगितले की, माझा प्रियकर सईद ताहेर बेग याचे दोन विवाह झाले असून त्याने माझ्याशी खोटे बोलून लग्नाचे आश्‍वासन देऊन अविवाहीत आहे, असे सांगून तसेच माझ्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची भीती घालून माझ्या इच्छेविरुध्द शारीरीक संबंध ठेवल्याने त्याच्यापासून मला 4 महिन्याची गर्भधारणा झाली आहे. मी त्याला लग्न करण्याची वारंवार विचारणा केली असता त्याने मला मारहाण, शिवीगाळ व मानसिक छळ करुन मला, तू मरुन जा, तू मेलीस तरी मला काही फरक पडणार नाही, असे म्हणून माझा प्रचंड छळ करत आहे, असे तिने आईला सांगितले. पण, समाजात बदनामी होईल या भीतीने आईने तिला समजावून सांगून माळीवाडा येथील घरी पाठवून दिले. 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्या मुलीला अन्न विषबाधा झाल्याने ती उपचारापूर्वीच आनंदऋषी हॉस्पिटल येथे मरण पावली आहे, असे नातेवाईकाने आईला सांगितले. नातेवाईकांकडून समजले की, मुलीचा गर्भपात व्हावा यासाठी तिचा प्रियकर सईद ताहेर बेग याने गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 15 नोव्हेंबर रोजी तिला दिल्या होत्या. त्यामुळे दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून तिला पोटदुखी, उलटी व अतिरक्तस्त्राव झाल्याने तिला दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटल येथे नेले होते. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलीचा प्रियकर सईद ताहेर बेग याने तिला लग्नाचे आश्‍वासन देऊन व तिच्या इच्छेविरुध्द शारीरीक संबंध ठेवून तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व तिचा शारीरीक छळ करून लग्न करण्यास नकार देऊन तिचा गर्भपात व्हावा म्हणून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, तिचा मृत्यु होण्याची जाणीव असताना कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या दिल्याने तिचा अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला, असे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सईद ताहेर बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत. दरम्यान, आरोपी बेग याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, 26 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

COMMENTS