Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला ः उद्धव ठाकरे

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर राज्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे

शिवसेना भवन, पक्षाची संपत्ती ठाकरेंकडेच
निवडणुका घेण्याची सरकारला भीती
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर राज्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला असल्याची जहरी टीका केली. रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचे समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटते फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडले. फडणवीसांच्या घरावर काही आले तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाही. एकूणच गुंडगिरीचे राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचे का गुंडमंत्री म्हणायचे हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावे, मंत्रिमंडळाच्या विस्तारात एक खाते निर्माण करावे आणि गुंडमंत्री असे पद निर्माण करून गुंड पोसण्याचे काम त्या मंत्र्याकडे द्यावे, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा दावा करत शिंदे गटाच्या काही महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना रविवारी समज देण्याचा प्रयत्न केला. हे ही चर्चा विकोपाला जाऊन त्यांच्यामध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.  

फडतूस कोण महाराष्ट्राला माहिती ः फडणवीसांचा पलटवार
अडीच वर्षांचा त्यांचा कारभार पाहिल्यानतंर नेमके फडतूस कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला महिती आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांचा त्यांचा कारभार पाहिल्यानतंर नेमंक फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती आहे. दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय? जे मुख्यमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात? ज्यांच्या काळात पोलिस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय? अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला.

COMMENTS