उच्चशिक्षित वकिलाला जातीमुळे नाकारली सदनिका ; बांधकाम व्यावसायिकांविरोधात अ‍ॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उच्चशिक्षित वकिलाला जातीमुळे नाकारली सदनिका ; बांधकाम व्यावसायिकांविरोधात अ‍ॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल

औरंगाबाद/प्रतिनिधी : औरंगाबाद शहर तसे पुढारलेले. दलित चळवळीचा बालेकिल्ला असणार्‍या या शहरात दलित वर्ग हा मोठया प्रमाणात उच्चशिक्षित असून, अनेक तरूण म

प्रियकराने प्रेयसीसह स्वतःला घेतले पेटवून
बहिणीचे शिर घेऊन सासरच्या मंडळीना दाखवत म्हणाला ‘अखेर तिला संपवले ‘ | LOKNews24
शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत

औरंगाबाद/प्रतिनिधी : औरंगाबाद शहर तसे पुढारलेले. दलित चळवळीचा बालेकिल्ला असणार्‍या या शहरात दलित वर्ग हा मोठया प्रमाणात उच्चशिक्षित असून, अनेक तरूण मोठया हुद्द्यावर काम करतात. मात्र याच शहरात एका उच्चशिक्षित वकीलाला आपल्या जातीमुळे सदनिका नाकारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दहा वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय करणारे अ‍ॅड. महेंद्र पंडितराव गंडले यांना औरंगाबाद येथील भूमी विश्‍वबन फेज टू हिरापूर साईड येथील रो हाऊस जातीय कारणाने नाकारण्यात आले. या साईटवर फक्त उच्चवर्णीय जातीतील लोकांना रो हाऊस दिले जाते. महार व इतर जातींच्या लोकांना या ठिकाणी रो हाऊस देण्यास साईडचे मालक यांनी सक्त मनाई करण्यात आल्यामुळे दलित समाजात तीव्र संतापाची भावना उमटली आहे. याप्रकरणी अ‍ॅड. गंंडले यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रोसिटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अ‍ॅड. गंडले यांना रो हाऊस पसंद पडल्यानंतर त्याची विक्री 30 लाख रुपयात केली जाईल असे सांगण्यात आले. यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम जमा करायची होती मात्र तेथील कर्मचार्‍याकडून जातीची विचारणा झाल्यानंतर त्यांना संबंधित वकील हा महार जातीचा असल्याचे कळल्यानंतर रो हाऊस देण्यास टाळाटाळ करण्यात आली. सदरील प्रकरणानंतर भूमी विश्‍वबनचे संचालक त्यांना भेटण्यासाठी गेले असता साईडवरील सर्व रो हाऊस विक्री झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही तासातच रिकामे असलेले रो हाऊस विक्री कसे झाले, फक्त जातीयवादी मानसिकतेतून रो हाऊस न देण्याचा घाट घालण्यात आला याप्रकरणी अ‍ॅडवोकेट महेंद्र गडले यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार भूमी विश्‍वबनचे मालक सोमानी, मकरंद देशपांडे, जैन व त्यांचेेेेेेेेेे इतर भागीदारांवर गुन्हे दाखल केले आहे.
औरंगाबाद सारख्या महानगरात देखील जातीयवादी भूमिका घेणार्‍या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. औरंगाबाद सारख्या शहरात उच्चशिक्षित लोकांनाही जातीयवादी मानसिकतेचा बळी पडण्याची वेळ आली आहे. उच्चशिक्षित कुटुंबातील अ‍ॅड.महेंद्र पंडितराव गंडले हे मागील दहा वर्षापासून औरंगाबाद उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. त्यांचे मोठे बंधू औरंगाबाद उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम पाहतात. तर बीड येथे जिल्हा न्यायालयात मागील सव्वीस वर्षापासून वकिली व्यवसायात कार्यरत असणारे वकील संघाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध वकील अविनाश गंडले हे त्यांचे बंधू असून त्यांच्या वहिनी औरंगाबाद उच्च न्यायालयात सरकारी वकील आहेत. उच्च विभूषित कुटुंबातील महेंद्र गंडले यांना या प्रकरणामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला असून, जातीच्या कारणामुळे रो हाउस नाकारणार्‍या जातीयवादी मानसिकतेच्या लोकांमुळे अ‍ॅड. गंडले यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. रो हाऊस बुकिंग करताना त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या त्यांनाही झाल्या प्रकरणामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला व त्याच ठिकाणी त्यांना रडू कोसळलं. उच्चशिक्षित व्यक्तीला जातीय कारणामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने जातीयवादी भूमिका निभावणार्‍या भूमी विश्‍वबन संचालक व त्यांचे सहकारी यांच्या विरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरील प्रकरणामुळे महाराष्ट्रभर बांधकाम व्यावसायिक विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दलित समाजात संतापाची लाट
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित वकीलाला केवळ जातीमुळे सदनिका नाकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर दलित समाजात संतापांची लाट उमटली आहे. स्वतंत्र भारताचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतांना देखील उच्चशिक्षित कुटुंबांना आजही केवळ जातीमुळे समान अधिकार मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. उच्चशिक्षित कुटुंबावर जर अशी वेळ येत असेल, तर इतरांना कोणत्या त्रासाला सामौरे जावे लागत असेल, याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी दलित संघटनांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS