Homeताज्या बातम्यादेश

अलविदा काॅम्रेड !

 कालच्या 'दखल' मध्ये जाहीर करूनही, आज अपवाद म्हणून आम्ही एखाद्या राजकीय नेत्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा विषय घेतला नाही; याचे कारण देशाच्या राजका

सुरेगाव शासकीय वाळू डेपोतून जीपीएसप्रणाली नसतांनाही वाळू वाहतूक
मिनाक्षीताई महाडिक यांचे पद रद्द करु पाहणार्‍यांना चपराक : जगन्नाथ माळी
आजोबांचा आपल्या 13 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार I LOKNews24

 कालच्या ‘दखल’ मध्ये जाहीर करूनही, आज अपवाद म्हणून आम्ही एखाद्या राजकीय नेत्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा विषय घेतला नाही; याचे कारण देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या अकाली निधनाने झाली आहे. सिताराम येचुरी यांचे व्यक्तिमत्व तसं पाहिलं तर ज्या राज्यांमध्ये कम्युनिस्ट विचारधारा वाढली नाही किंवा कधी सत्ता आली नाही, अशा आंध्रप्रदेश मधून येऊनही, ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख झाले; यामध्येच त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला अंदाज यावा! १९७४ मध्येच त्यांनी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्या चळवळीच्या विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला. तेव्हापासूनच त्यांचा चळवळीचा, आंदोलनाचा आणि पर्यायाने राजकारणाचा आलेख सतत वाढता राहिला. ओघवती वक्तृत्व शैली असणारे काॅम्रेड सिताराम येचुरी, हे भारतीय राजकारणाचा एक समन्वयी चेहरा म्हणून १९९२ पासूनच दृष्टीपथात आले. राष्ट्रीय राजकारणात ते सातत्याने वावरत राहिले. त्यांना २००५ ते २०१७ या कालावधीमध्ये राज्यसभेचे सदस्यत्व पश्चिम बंगाल मधून करण्याची संधी मिळाली. तिसऱ्यांदा ही त्यांना संधी मिळावी, अशी चर्चा असताना पक्षाने त्यावर आक्षेप घेतल्यावर काॅम्रेड येचुरींनी त्यापासून माघार घेतली. देशात मंडल आयोग लागू झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने घेतलेले अति जहाल स्वरूप पाहता आणि नव्वदच्या दशकातच ज्या सेक्युलर राष्ट्रीय राजकारणाची गरज देशाला निर्माण झाली, त्यामध्ये काॅम्रेड सिताराम येचुरी यांचा चेहरा एक आश्वासक चेहरा होता. सेक्युलर पक्षांमध्ये त्यांची मैत्री ही सर्व पक्षीय आणि सर्वस्पर्शी होती. डाव्या चळवळीत राहूनही आणि कष्टकरी, मजूर, शेतकरी यांच्यामध्ये कार्य करतानाही त्यांनी त्या सगळ्यांमध्ये समन्वय ठेवणं आणि आश्वासक राहणं, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सिताराम येचुरी यांनी इंडिया आघाडीच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलला. अर्थात १९९६ मध्ये देशात यूपीए आघाडी निर्माण करण्यात सिताराम येचुरी यांचा मोठा सहभाग राहिला. पक्षशिस्त आणि पक्षाची वाढ करणे यामध्ये सिताराम येचुरी कधीही कमी पडले नाही. देशभर आंदोलन, मोर्चे आणि राजकीय घडामोडी मध्ये व्यस्त असणारे सिताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील पहिले असे नेते आहेत की, ज्यांचा संबंध थेट पश्चिम बंगाल किंवा केरळ या कम्युनिस्ट बहुल राज्यात जन्म झाला नाही. ते मुळत: आंध्र प्रदेशातून आले. मनमोहन सिंग सरकार यांच्या यूपीए सरकारच्या काळात ते सातत्याने समन्वयी राहिले. परंतु, युपीए दोनमध्ये अमेरिकेबरोबर केलेल्या अनुकराराच्या अनुषंगाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जी विरोधात भूमिका घेतली, त्यातून त्यांनी सत्ता आघाडीतून बाहेर पडण्याचं आणि समर्थन काढून घेण्याचही पाऊल उचललं. त्यात सिताराम येचुरी प्रामुख्याने सहभागी राहिले. अर्थात, त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असलेले तात्कालीन संसदेचे सभापती असलेले लोकसभा अध्यक्ष असलेले सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता. त्याहीवेळी सीताराम येचुरी हे पक्षाबरोबरच राहिले. कोरोना काळात सिताराम येचुरी यांचा तरुण मुलगा दगावल्यानंतरही कॉम्रेड सिताराम येचुरी राजकारणाच्या सेक्युलर प्रवाहाला दिशा देत राहिले. त्यांचे ओघवत भाष्य कार्यकर्त्यांना सहजपणे समजावून सांगणारे आणि समजून घेणारे राहिले. त्यांची शब्दशैली, प्रसन्न व्यक्तिमत्व, कोणत्याही मतभेदाला सौम्यपणे व्यक्त करण्याची त्यांची अनोखी पद्धत, त्याच वेळी राष्ट्रीय राजकारणात चुकीच्या राजकीय शक्तींच्या विरोधात अतिशय आक्रमक भाषेमध्ये तुटून पडणं, ही त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य कायम आपल्या  मनात राहतील. ऑगस्ट महिन्यात त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्याने, त्यांना त्यातून वैद्यकीय प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही बाहेर पडता आले नाही. अखेर त्यांची प्राणज्योत १२ सप्टेंबर रोजी मालवली. देशाच्या सेक्युलर राजकारणाला लढवय्ये वळण देणाऱ्या कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल देशाच्या राजकारणात एक निश्चित पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून निघेलच असं नाही! अलविदा काॅम्रेड!

(दखल)

COMMENTS