Homeताज्या बातम्यासंपादकीय

सुवर्णकन्येचा संघर्ष

ऑलिम्पिक स्पर्धा या जागतिक स्पर्धा असून, या स्पर्धेमध्ये एक सुवर्णपदक मिळवण्यासाठी भारताला बर्‍याच दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असतांना

पेपरफुटीला चाप बसेल का ?
प्रदूषणाचा विळखा
एन्काउंटर व्यवस्थेचा की प्रवृत्तीचा ?

ऑलिम्पिक स्पर्धा या जागतिक स्पर्धा असून, या स्पर्धेमध्ये एक सुवर्णपदक मिळवण्यासाठी भारताला बर्‍याच दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असतांना ही प्रतीक्षा संपेल आणि विनेश फोगट भारताला सुवर्णपदक मिळवून देईल, अशी सर्व देशवासियांना अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. विनेशाचे वजन केवळ 100 ग्रॅम अतिरिक्त भरल्यामुळे तिला अपात्र करण्यात आले. त्यामुळे कांस्यपदक, रौप्यपदक देखील मिळू शकले नाही. खरंतर याप्रकरणी संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. याशिवाय यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत होता. कारण ऑलिम्पिक स्पर्धांपूर्वी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया या खेळाडूंनी कुस्तीसंघाचे तत्कालीन अध्यक्षांविरोधात बंड पुकारले होते. त्यासाठी त्यांनी धरणे आंदोलने करून सरकारला जेरीस आणले होते. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा संपूर्ण भारतीयांनी बघितला होता. त्यांना आंदोलनाच्या स्थळावरून फरफटत नेण्यात आले होते. त्यानंतर या संघर्षयोद्धांनी आपले पदक देखील परत करण्याचा निर्णय घेतला होता. या संघर्षात साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली. मात्र विनेश फोगट लढत राहिली. ती सर्वांविरूद्धच लढत राहिली. ऑलिम्पिमध्ये देखील एकाच दिवशी तीन कुस्तीपटूंना चीतपट करणे सोपे नव्हते. त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागतो, त्याचप्रमाणे तुमच्यात तेवढीच कल्पकता देखील असावी लागते. ताकदीसोबतच या सर्व बाबींमध्ये विनेशा उजवी होती. आणि तिने याच जोरावर अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम खेळीत एका खेळाडूला चीतपट केल्यानंतर ती सुवर्णपदकाची मानकरी ठरणार होती. मात्र त्यापूर्वीच तिला अपात्र करण्यात आले. कारण अंतिम फेरीपूर्वी तिचे वजन करण्यात आले, आणि ते 50 किलोपेक्षा जास्त भरले. वास्तविक पाहता तीन खेळाडूंना चीतपट केल्यानंतर उद्या सकाळी आपले वजन होणार याची तिला पूर्ण माहीती होती. यासाठी रात्रभर ती जागी होती. सायकलिंग, दोरीवरच्या उड्या, विविध औषधे पोटात देवून पोट साफ करणे, यासारख्या अनेक बाबींचा अवलंब ऑलिम्पिक पथकातील भारताच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले. मात्र तरीही 100 ग्रॅम वजन अतिरिक्त ठरले आणि तिचा घात झाला. वास्तविक पाहता विनेशा नेहमीच 50 पेक्षा जास्त वजनगटात खेळायची. मात्र यावेळेस तिने 50 किलो वजनगटात खेळण्याचा निर्णय घेतला. खरंतर या बाबी ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वीच निर्धारित होतात. भारतातून रवाना होण्यापूर्वीच खेळाडू कोणत्या गटात खेळणार आहे, या सर्व बाबी निर्धारित होत असतांना विनेशा आणि तिच्या सोबत जाणारे पथक इतके कसे निर्धास्त राहिले हा महत्वाचा प्रश्‍न आहे. कारण ज्या दिवशी लढती झाल्या, त्यारात्री तिचे वजन 52.7 किलो भरले होते. दोन किलो सातशे ग्रॅम अधिक वजन होते. त्यामुळे हा एकप्रकारचा गाफीलपणा म्हणावा की, बेजबाबदारपणा म्हणावा. कारण स्पर्धेपूर्वी आणि नंतर तिच्या वजनात किमान एक किंवा सव्वा किलोचा फरक पडला असता, तर ते वजन आटोक्यात आणणे सहज शक्य होते. मात्र एका रात्रीत अडीच किलोच्या वर वजन कमी करणे अशक्यप्राय होते. कारण यामुळे तिच्या जीवावर देखील बेतले असते. यासाठी नाना युक्त्या करण्यात आल्या. तरीही तिचे वजन कमी होवू शकले नाही. फक्त 100 ग्रॅम वजन अतिरिक्त ठरल्यामुळे विनेशा सुवर्णपदकाला मुकली असेच म्हणावे लागेल. ती जरी सुवर्णपदकाला मुकली असली तरी संपूर्ण देशवासियांनी तिला दिलेला पाठिंबा वाखाण्याजोगा होता. आणि भलेही विनेशा सुवर्णपदक जिंकली नसेल, मात्र तरीही तिला खर्‍या अर्थाने सुवर्णकन्याच म्हणावे लागेल, कारण तिचा ऑलिम्पिकमधील संघर्ष हा साधा नव्हता. भलेही तिला पदक मिळाले नसले तरी, तिचा संघर्ष हा अतिशय खडतर होता.

COMMENTS