सोलापूर/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुका लढण्यासाठी सर्व पक्षीयांकडून जोरदार मोर्चेबांधणी होत असतांना, निवडणुकीच्या तोंडावर अनेक युती, आणि आघाडी
सोलापूर/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुका लढण्यासाठी सर्व पक्षीयांकडून जोरदार मोर्चेबांधणी होत असतांना, निवडणुकीच्या तोंडावर अनेक युती, आणि आघाडी अजूनही होण्याचे बाकी आहे. अशावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला इशारा देतांना म्हटले आहे की, आगामी लोकसभेसाठी 5 जागा द्या, अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. पंढरपूरमधील संत नामदेव पायरी पासून जनस्वराज्य यात्रेला शुभारंभ केला, यावेळी ते बोलत होते. जानकर यांनी काही दिवसांपूर्वीच रासपला मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्याबद्दल देखील मागणी केली होती.
यावेळी बोलतांना जानकर म्हणाले की, लोकसभेसाठी बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत एनडीएमध्ये राहू अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहे. एका बाजूला भाजप हा एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे नवीन मित्र बरोबर घेत असताना जुन्या मित्रांकडे दुर्लक्ष होत असल्याची सल महादेव जानकर यांच्या बोलण्यात दिसत होती. सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून जनता शहाणी असते असा टोला शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडलेल्या भाजपला दिला. रासपची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात आजपासून जानकर हे आपल्या पक्षाची यात्रा घेऊन निघालेले आहेत. भारतीय जनता पक्षाने जर आमचा विचार केला नाही तर लोकसभेच्या देशात 453 जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक दिवस मी देशाचा पंतप्रधान बनणार आणि विठ्ठलाच्या दर्शनाला येणार असा दावाही जानकर यांनी केला. बारामती लोकसभा हा आपला आत्मा असून बारामतीची जागा यासाठीच मागितली असून तिथूनही लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 पासून साथ दिलेल्या घटक पक्षांना भाजपने कुठल्याही सत्ता स्थापनेत विचारात घेतले नाही. त्यामुळे माजी मंत्री बच्चू कडू तर नाराज झाले आहेत. यानंतर आता जानकर यांची वेगळी भूमिका भाजपाला चांगलीच अडचणीची ठरणार आहे. जानकर यांनी मागितलेल्या सर्व पाचही जागा या भाजप लढवत आला असून आता रासपच्या भूमिकेमुळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांनीच अजितदादांना पाठवले असावे – शरद पवार हे खूप हुशार आणि मातब्बर राजकारणी असून सध्या राष्ट्रवादीचे काही नेते अडचणीत आल्याने त्यांनी अजित पवार यांना इकडे पाठवले असण्याची शक्यताही महादेव जानकर यांनी बोलून दाखवली. ज्या पद्धतीने महादेव जानकर यांनी भाजपाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे ते पाहता जुना मित्र असलेला रासप भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
COMMENTS