माजलगाव । प्रतिनिधीश्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव येथील सन 1978 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी अनेक दशकांनंतरही शालेय मैत्रीची गोड नाती ज

माजलगाव । प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव येथील सन 1978 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी अनेक दशकांनंतरही शालेय मैत्रीची गोड नाती जपण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. काळ लोटला तरी मैत्रीची वीण आजही तितकीच घट्ट असल्याचे हे गेट-टुगेदर जिवंत उदाहरण ठरत आहे.
या बॅचचा पहिला गेट-टुगेदर दि. 31 डिसेंबर 2022 रोजी माजलगाव येथील शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात व ऐतिहासिक स्वरूपात पार पडला होता. त्या अविस्मरणीय सोहळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सर्व मित्रांच्या मनात पुन्हा एकदा एकत्र येण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. याच भावनेतून द्वितीय गेट-टुगेदर ‘हुरडा पार्टी’च्या निमित्ताने दि. 27 जानेवारी 2026 रोजी दौलताबाद येथील निसर्गरम्य ‘पर्णकुटी’ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजलगाव येथील व्यापारी मित्र सुभाष दुगड, जुगल किशोर मानधने, रमेश परिख, छत्रपती संभाजीनगर येथील ओमप्रकाश मालपाणी व संपादक मंदाकिनी जाबा, सोलापूर येथील डॉ. सोळंके व डॉ. मीना तोतळा, पुणे येथील राजेंद्र सोनी, तसेच परतूर (जि. जालना) येथील रामप्रसाद जेथलिया हे सर्व मित्र समन्वयक म्हणून प्रयत्नशील भूमिका बजावत आहेत. या गेट-टुगेदरला मित्रमंडळींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सहभागी होण्यासाठीची रक्कमही वेगाने जमा होत आहे. विविध शहरांतून येणार्या मित्रांच्या येण्या-जाण्याचे नियोजन स्थानिक मित्रांच्या माध्यमातून सुरळीतपणे करण्यात येत आहे. ज्या मित्रांनी अद्याप सहभागाची रक्कम जमा केलेली नाही, त्यांनी त्वरित जमा करावी, जेणेकरून हुरडा पार्टीसह इतर खर्चांचे योग्य नियोजन करता येईल, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व मित्रांच्या सहकार्यामुळे हा द्वितीय गेट-टुगेदर देखील मैत्री, आनंद, आठवणी व आपुलकीने भरलेला एक अविस्मरणीय सोहळा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS