Homeताज्या बातम्यासंपादकीय

संपत्तीची मस्ती आणि व्यवस्था

देशामध्ये कायद्याचे राज्य असून देखील त्या कायद्याला आपण संपत्तीच्या जोरावर पाहिजे तसे वाकवू शकतो, असा वृथा अभिमान संपत्तीच्या मस्तीतून दिसून येतो

जनतेचा कौल कुणाला मिळणार  ?
काँगे्रसचा बदलता चेहरा
राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेतेपद

देशामध्ये कायद्याचे राज्य असून देखील त्या कायद्याला आपण संपत्तीच्या जोरावर पाहिजे तसे वाकवू शकतो, असा वृथा अभिमान संपत्तीच्या मस्तीतून दिसून येतो. पुण्यातील उद्योगपतींच्या मुलाने दोघांना आपल्या कारने उडवून त्यांचा जीव घेतला. यानंतर या उद्योगपतीला त्या दोन जीवांशी काहीही घेणे-देणे नाही, मात्र आपला मुलगा सहीसलामत सुटला पाहिजे, यासाठी हवा तितका पैसा ओतण्याची तयारी या उद्योगपतींने दाखवल्याचे समोर आले आहे. खरंतर याप्रकरणात अनेक बडे नेते आणि पोलिस अधिकार्‍यांचे हात गुंतले आहे. कारण त्यांनी या मुलाला वाचवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद यामागे लावली होती. मात्र याप्रकरणात जेव्हा हा मुलगा जामिनावर सुटल्यानंतर सर्वसामान्यांच्या संतापाचा जो कडेलोट झाला, त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. आणि माध्यमांनी हा प्रश्‍न उचलून धरल्यानंतर सरकारला या आक्रोशापुढे लोटांगण घालत निरपेक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले. खरंतच या प्रकरणात पोलिस आयुक्तांपासून सर्वच पोलिस अधिकार्‍यांचा हजगर्जीपणा दिसून येतो. ज्या दिवशी या मुलाने दोघांना आपल्या कारने उडवले, त्याच दिवशी पोलिस आयुक्तांनी सर्व सुत्रे हातात घेऊन पोलिसांना सक्त सूचना देवून, याकामी गुन्हा नोंदवून आरोपी कसा सुटणार नाही, याची तजवीज करण्याची गरज होती. खरंतर या प्रकरणात आरोपीचे ब्लॅड सॅम्पलच बदलण्यात आले, त्यापोटी ससुनच्या दोन डॉक्टरांना तीन-तीन लाख रूपये देण्यात आले. म्हणजे व्यवस्थेचा हा किती गलिच्छपणा आहे. खरंतर संपत्तीमुळे आपलं कुणी काहीच वाकडे करू शकत नाही, असे संस्कार अग्रवाल सारख्या अनेक कुटुंबांत दररोज होतांना दिसून येतात.

त्यामुळे अशा अवलादी नंतरच्या आयुष्यात पुरती वाया जातात. अशा अवलादींना नम्रपणे वागण्याची, ज्येष्ठ व्यक्तीसमोर सभ्यतेने बोलण्याची शिकवण घरातून मिळण्याची गरज आहे. परंतु ज्या घरात बंदुकीच्या धाकावर अनेकांना धमकावले जात असेल, तोंडात सारख्या शिव्या असेल, अशा कुटुंबातील व्यक्तींकडून संस्काराची आणि सभ्यतेची काय अपेक्षा करणार. वास्तविक पाहता संपत्ती, पैसा हा मानवाचे जीवन सुलभ आणि सुसह्य करण्यासाठी आहे. त्यातून समृद्धी आणली पाहिजे. मात्र आजकाल पैशांचा अहंकार वाढत चालला आहे. पैशा असला म्हणजे माझा मुलगा इतरांपेक्षा वेगळा कसा, असा अट्टाहास आपण धरतांना दिसून येतो. खरंतर संपत्ती कितीही असो, आपल्या मुलांना इतर मुलांसारखे जगायला शिकवण्याची खरी गरज आहे. त्याला भूक लागल्यानंतरच जेवण दिले पाहिजे. मात्र भुक लागण्याआधीच आपण त्याला जेवू घालतो, त्याला गरजेआधीच आपण प्रत्येक गोष्ट पुरवतो, त्यामुळे त्याला त्या गोष्टींची किंमत उरत नाही. त्यामुळे या गोष्टीतून अनेक बाबी शिकण्याची गरज आहे. त्याचबरोबर राज्यात कायद्याचे राज्य आहे का, हा महत्वाचा प्रश्‍न उपस्थित होतो. पुण्यातील पब आणि बारच्या माध्यमातून 500 कोटींची वसुली केली जाते, असा धक्कादायक आरोप आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केला आहे. आणि ही सत्य परिस्थिती आहे. आकडे कमी-जास्त असू शकतात, मात्र पोलिस विभाग, आरोग्य विभागासह सर्वंच विभागात ही वसुली जोमात सुरू असते, बरं ही वसुली राजकीय लोकप्रतिनिधींना माहित नाही का, असेही नाही. खरंतर बदलीच्या व्यवहारातून जी वसुली होते, त्यातून आपला व्यक्ती या पदावर बसवायचा, आणि त्याच्याकडून एक रक्कम घ्यायची, आणि मग तो ती रकमेच्या दोन-तीनपट वसूल करण्याच्या मागे लागतो, असेच चित्र संपूर्ण राज्यात पसरलेले आहे. मात्र तरी देखील त्यावर कठोर उपाययोजना करण्याची हिंमत कोणत्याही सरकारमध्ये नाही, कारण ही व्यवस्थाच त्याने पोखरलेली आहे. त्यात मरण मात्र सर्वसामान्य माणसांचे होते. दररोज त्याचा मृत्यू असाच किड्या-मुंग्यासारखा होतो, आणि तरीही त्याला न्याय मिळत नाही, हीच आपल्या लोकशाहीची आणि इथल्या कायद्याचे राज्य असल्याची शोकांतिका आहे.

COMMENTS