Homeताज्या बातम्यासंपादकीय

द्वेषपूर्ण वक्तव्यांना खतपाणी

देशात सध्या द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. जो तो येतो आणि आपले अकलेचे तारे तोडतो आणि गरळ ओकून मोकळा होतो, आणि त्यानंतर

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकिय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी
राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान
राजकीय निवाडा..

देशात सध्या द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. जो तो येतो आणि आपले अकलेचे तारे तोडतो आणि गरळ ओकून मोकळा होतो, आणि त्यानंतर मात्र पेटतो तो हिंसाचार. त्या हिंसाचाराला रोखणे मग अशक्य होते. त्यामुळे हिंसाचार रोखायचा असेल तर, आपल्या अकलेचे तारे तोडणार्‍यांच्या मुसक्या आधी आवळण्याची गरज आहे. हरियाणामधील जातीय हिंसाचाराविरोधात विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये द्वेषपूर्ण भाषणे किंवा हिंसाचार झाल्यास कडक कारवाई करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या मोर्चाना स्थगिती देण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला. यासंदर्भात संबंधित राज्य सरकारे व दिल्ली पोलिसांना खबरदारी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्यांना रोखायचे कसे हा महत्वाचा प्रश्‍न समोर उभा ठाकला आहे. देशात हेट स्पीचच्या वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने याविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय याविरोधात कायदा करून आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याची गरज आहे. अन्यथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून आरोपी मोकाट सुटलेला असतो आणि जामीन घेवून मोकळा राहतो, मात्र त्यामुळे द्वेषपूर्ण वातावरण तयार होवून, हिंसाचार वाढतो, त्यात अनेक जणांचा जीव जातो, मात्र द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्‍याला त्याचे कसलेही सोयरसुतक राहत नाही. केंद्र सरकारयाविरोधात कायदा आणण्याची तयारी करतांना दिसून येत आहे. द्वेषयुक्त भाषणाची व्याख्या या कायद्यानुसार ठरवली जाईल. कायद्याचा मसुदा तयार केला जात आहे. आता द्वेषपूर्ण भाषणाबाबत स्केल ठरवले जाईल.या कायद्यात केवळ हिंसा पसरवणारा मजकूरच नाही, तर खोटे पसरवणारे आणि आक्रमक विचार करणारेही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. सरकार या विषयावर बराच काळ विचार करत होते पण आता जास्त वेळ न घेता त्याचा मसुदा तयार केला जात आहे. विधी आयोगाने हेट स्पीचवरील आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये हे स्पष्ट केले आहे की, केवळ हिंसा पसरवणार्‍या भाषणालाच हेटस्पीच मानले जाणे आवश्यक नाही, इंटरनेटवर ओळख लपवून खोटे आणि आक्षेपार्ह कल्पना सहजपणे पसरवल्या जात आहेत, अशा प्रकारचे भेदभाव आणि जातीय भाषा देखील द्वेषयुक्त भाषणाच्या कक्षेत ठेवली पाहिजे, यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाईचा मार्ग खुला होईल, द्वेषयुक्त भाषणाची व्याख्या स्पष्ट झाल्यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांद्वारे पसरवल्या जाणार्या फेक न्यूज किंवा द्वेषपूर्ण गोष्टींपासून दूर जाऊ शकणार नाहीत, सोशल प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती पसरवली जाते, आता त्यांच्याविरोधात कठोर कायदे करून कायदेशीर मार्ग कारवाई उघडली जाईल. तरच असे द्वेषपूर्ण वक्तव्य रोखता येईल. मात्र अनेक ठिकाणी अशा द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्‍यांना सत्ताधारी पाठीशी घालण्याचा प्रकार करतांना दिसून येत आहे. मात्र त्याऐवजी अशा प्रवृत्तीला खतपाणी घालण्यात येते. मग अशा प्रवृत्ती काहीजणांना गुरूजी वाटतात, तर काहीजणांना अशा प्रवृत्तींना धडा शिकवावा लागतो. मात्र राज्यकर्त्यांनीच आता अशा प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचे ठरवल्याचे दिसून येत आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास शेंगदाणा चांगला आहे, पण तो शेणात पडला तर, तो आपण उचलतो का, तर नाही ना. मुळातच शेंगदाणा चांगला होता, खाण्यायोग्य होता, मात्र तो शेणात पडला आहे, त्यामुळे त्याला स्वीकारता येत नाही. त्याचप्रमाणे एखाद्याचे कार्य जरी चांगले असले तरी, तो जर गरळ ओकत असेल, तर त्याला गुरुजी म्हणणे म्हणजे शेणातील शेंगदाण्याला चांगला म्हणण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल.

COMMENTS