Homeताज्या बातम्यासंपादकीय

श्रमाचे सौंदर्यशास्त्र गाणारा कवी ! 

 या नभाने या भुईला दान द्यावे,........ जसे जोंधळ्याला चांदण्या कडून जावे, अशा महान काव्याच्या ओळी रेखाटणारे महान कवी म्हणूनच  ना. धो. महानोर, यां

रस्त्यावरचा अपघात !
पिढीचे भान ठेवा!
ब्रिटनचे माणूस केंद्रीत धोरण ! 

 या नभाने या भुईला दान द्यावे,…….. जसे जोंधळ्याला चांदण्या कडून जावे, अशा महान काव्याच्या ओळी रेखाटणारे महान कवी म्हणूनच  ना. धो. महानोर, यांचा गौरव करता येणार नाही तर; जगण्याच्या अनुभूतीतला, शेतीतल्या श्रमाची, सौंदर्य मीमांसा त्यांनी काव्यातून केली. त्यांचं काव्य हे श्रमिक समाजाचे, बहुजन समाजाच्या मनाचा ठाव घेते. ना. धो. महानोर हे खरे तर काव्य क्षेत्रातील विठ्ठल! पण, त्यांना व्यवस्थेतल्या सनातन बडव्यांनी खरंतर घेरले होते. मात्र, त्यांच्या कवितेतून श्रमिकांचं श्रम, शेतकऱ्यांचे श्रम, ज्या पद्धतीने मांडलं जातं, आणि त्या शब्दांना काव्य, निसर्ग काव्य आणि रान कविता म्हणून जेव्हा संबोधलं जातं, तेव्हा, श्रमाचे सौंदर्यशास्त्र काय असतं, हे अनुभूतीतून शब्दबद्ध करणारा हा महान कवी, आज आपल्यातून गेल्याने खरोखर या भुईवर नभाने अश्रू ढाळण्याचा प्रसंग आहे. ज्याला आपण पावसाळा म्हणतो, अशा काळात जाणं, खरंतर ही एक त्यांच्या जीवनाची सांगता पाहताना एक अद्वितीय अशीच घटना मानावी लागेल. त्यांची तुलना कोणत्याही निसर्गकवीशी होऊ शकत नाही. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी बालकवींच्या सारखा निसर्ग कवी, अशा पद्धतीची तुलना त्यांची केली असली तरी, ती आम्हाला अमान्य आहे! कारण, बालकवी हे निसर्गाचे निरीक्षक होते. निसर्गाचं निरीक्षण करताना त्यांनी फुल,झाड,वेली यांचं जे वर्णन केलं आहे, त्याला उपमा आणि विशेषणांनी रंगवले आहे. परंतु, त्यांचं निसर्ग काव्य हे केवळ कल्पनाविश्वावर आधारले आहे. ना. धो. महानोर यांचं तसं नाही. त्यांच्या रान कविता त्यांच्या निसर्ग कविता ज्या शब्द घेऊन जन्म घेतात, त्या केवळ कवी कल्पना नाहीयेत; तर, आपल्या मातीत स्वतःचा घाम गाळून, मातीच्या सौंदर्याला जे स्वतःच्या असामान्य प्रतिभेने फुलवलं गेलेल आणि फुललेलं ते सौंदर्य, त्यांनी जेव्हा शब्दबद्ध केलं तेव्हा त्यांच्या शब्दांनी आणि त्यांच्या शब्दांनी सजलेल्या काव्यांनी भारतातल्या किंवा मराठी विश्वातल्या प्रत्येक माणसाच्या मनाचा ठाव घेतला. ना. धो. महानोर यांच्या कविता, या केवळ रानातल्या किंवा निसर्गातल्या कविता नाहीत. जगण्याच्या श्रमिक अनुभूतीच्या त्या कविता आहेत. म्हणून जैत रे जैत सारख्या चित्रपटांमधून ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी समूहाचे जेव्हा वर्णन त्यांच्या गीतातून येते. त्याचंही जीवन  सहज शब्दबद्ध जेव्हा होते, तेव्हा, ठाकर यांचे जीवन काय आहे, याचा प्रत्यक्ष त्यांनी घेतलेला स्वानुभव आणि त्यातूनच स्फूरलेलं काव्य हे आजही मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेते. ना. धो. महानोर हे केवळ कवी नाहीत तर ते बहुजन समाजाच्या उत्पादक श्रमाला, अनुभूतीच्या सौंदर्यशास्त्राने बहरवणारे एक महान कवी आहेत. यात कोणतीही शंका नाही. मातीतलं श्रम करताना ते दिवसाच्या वेळी कसं असतं, रात्रीच्या प्रहरी कसं असतं, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहर असतात, त्यावेळी त्या श्रमाची अनुभूती काय असते, चांदण्या रात्री केलेल्या श्रमाची अनुभूती आणि त्या श्रमाला आलेली बीज, फुटलेली पालवी, आलेला प्रतिसाद, याचं वेगवेगळ्या प्रहरांमधलं सौंदर्य काय असतं, याची अनुभूती ना. धो.  महानोर यांनी ज्या पद्धतीने मांडलेले आहे, त्याला जगाच्या कोणत्याही साहित्यामध्ये तोड नाही. कारण एवढा मातीशी समरस होऊन आपल्या मातीच्या सौंदर्यावर असं निसर्ग काव्य लिहिणारा प्रतिभावंत म्हणून ना. धो. महानोरांना या देशातल्या किंवा महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांपासून तर सामाजिक चळवळीपर्यंत कोणत्याही विचारांच्या, प्रबोधनाच्या कुठल्याही चळवळी असतील त्या सगळ्यांनी ना. धो. महानोरांचं हे विश्व अशा पद्धतीने व्यापून टाकते. ना. धो.  महानोर हे खरंतर बहुजन समाजातले एक महान कवी. परंतु, त्यांच्या प्रतिभेला पाहून ज्या पद्धतीने त्यांना व्यवस्थेत  वरच्या समाज समूहाने घेरलं, त्यामुळे ना. धो. महानोर कवी म्हणून महान, श्रेष्ठ राहिले. त्यांच्या कविता जीवनाच्या अनुभूति वाचकांना करत राहिल्या. परंतु, तरीही बहुजन समाजामधला त्यांचा वावर हा लोकप्रिय किंवा लोकांमध्ये शिखर गाठू शकला नाही. याचं कारण त्यांना अनेक सनातनी विचारांचा घेराव पडलेला होता. या महान कवीला महाराष्ट्राच्या जनतेमध्ये खऱ्या अर्थाने वावर करता आला नाही! परंतु, यामुळे त्यांच्या काव्याची प्रतिभा डागाळत नाही किंवा त्यावर जराही काजळी येत नाही, हे मात्र निश्चित. शेती विश्वाला  आणि श्रमाला ज्या सौंदर्याने शब्दांच्या फुलोऱ्यात त्यांनी बंदिस्त केले, अशा या महान कवीला विनम्र अभिवादन.

COMMENTS