उद्या पंतप्रधान मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चानवी दिल्ली ः फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे चार दिवसीय भारत दौर्यावर येत असून भारत

उद्या पंतप्रधान मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली ः फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे चार दिवसीय भारत दौर्यावर येत असून भारत-फ्रान्स संबंधांना नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 16 फेब्रुवारी रोजी ते मुंबईत आगमन करणार असून त्यानंतर 17 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या दौर्याची अधिकृत माहिती दिली आहे.
मुंबईतील बैठकीत दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, नवोपक्रम आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत विविध करारांवर स्वाक्षर्या होण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही नेते नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ही परिषद लोककल्याण, पर्यावरण संरक्षण आणि सर्वांगीण प्रगती या तीन आधारस्तंभांवर केंद्रित असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दौर्यादरम्यान भारत-फ्रान्स नवोपक्रम मंचाचे आयोजन मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल येथे करण्यात आले आहे. या मंचात उद्योग, संशोधन संस्था आणि नवउद्योजक यांचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक स्मरणोत्सवाचे आयोजन करून दोन्ही देशांतील ऐतिहासिक व सांस्कृतिक नात्यांना उजाळा दिला जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन याही भारत भेटीत सहभागी होणार आहेत. 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि नवी दिल्ली येथे विविध कार्यक्रम पार पडतील. ‘नवोपक्रम वर्ष 2026’ हा उपक्रम दोन्ही देशांमध्ये वर्षभर साजरा केला जाणार असून संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याचा त्यामागील उद्देश आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून होणारा हा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा चौथा भारत दौरा ठरणार आहे. 2018 मधील त्यांच्या पहिल्या भारत भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक स्वरूप प्राप्त झाले. संरक्षण सहकार्य, समुद्री सुरक्षा, अवकाश संश_ीेंससश्रश आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत दोन्ही देशांनी सातत्याने भागीदारी मजबूत केली आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांना प्राधान्य देत सहकार्याचा नवा अध्याय लिहिला जात आहे. भारतातील फ्रेंच दूतावासानेही या दौर्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. द्विपक्षीय कार्यक्रमांसोबतच शिखर परिषदेत सहभागातून नवी दिल्ली आणि पॅरिस यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील वाढत्या सहकार्यामुळे जागतिक पातळीवरही दोन्ही देशांची भूमिका अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट न राहता तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे उचललेले पाऊल म्हणून पाहिला जात आहे. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्याची क्षमता या भेटीत दडलेली आहे.

COMMENTS