पुणे : परदेशी चलन व्यवसायात (फॉरेक्स ट्रेडींग) गुंतवणुकीच्या आमिषाने 20 जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी
पुणे : परदेशी चलन व्यवसायात (फॉरेक्स ट्रेडींग) गुंतवणुकीच्या आमिषाने 20 जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत तुकाराम मोरे (रा. गांधीनगर, सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते (रा. कोळकी, सातारा), अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण (रा. मुनानगर, सातारा), शशिकला मारूती वादगावे, सुरेश गोरख कुंभार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी 20 जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहेत. आरोपींविरुद्ध फसवणूक, अपहार, तसे महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण काायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिगंबर पोपट गायकवाड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांना परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष आरोपींनी दाखविले होते. आरोपींनी एका वित्तीय संस्थेचे संचालक असल्याची बतावणी केली होती. गायकवाड यांनी आरोपींकडे 22 लाख 50 हजार रुपये दिले. सुरुवातीला आरोपींनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी गायकवाड यांच्यासह 20 जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS