नगरच्या बिग्मीद्वारे तब्बल 100 कोटींची फसवणूक; एसआयटी चौकशीची ठेवीदारांची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या बिग्मीद्वारे तब्बल 100 कोटींची फसवणूक; एसआयटी चौकशीची ठेवीदारांची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील बिग्मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये राज्यातील सुमारे दीड हजार लोकांनी थेट तर कुकाणा अर्बन मल्टीनिधी पतसंस्थेच्

 मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 75 रुग्णांनी घेतला लाभ
नगर अर्बन सस्पेन्स घोटाळ्यात गांधी बंधूंसह त्यांच्या चुलतीला वॉरंट
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील बिग्मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये राज्यातील सुमारे दीड हजार लोकांनी थेट तर कुकाणा अर्बन मल्टीनिधी पतसंस्थेच्या माध्यमातून कंपनी अंतर्गत केलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे लाखोजणांनी गुंतवणूक केली असल्याने यात झालेल्या फसवणुकीची रक्कम 100 कोटींवर असल्याचा दावा ठेवीदारांनी सोमवारी (13 डिसेंबर) येथे केला व या फसवणुकीची एसआयटीद्वारे चौकशीची मागणी केली. नगरमधील आरोपी सोमनाथ राऊत, त्याची पत्नी सोनिया राऊत व त्याचा दाजी (मेव्हणा) यांनी ही फसवणूक केली असून त्यांच्या या कंपनीने अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. याबाबत येथील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये 4 डिसेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असतानादेखील सुद्धा पोलीस प्रशासन या घटनेचा तपास करायला तयार नाही, तपासी अधिकारी अजून नेमला नाही, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास दिल्याचे सांगितले जात असले तरी याबाबतच्या आदेशावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रिमार्कच मारलेला नाही, असे आर्थिक गुन्हे शाखेतून सांगितले जात आहे. त्यामुळे जर वेळेत तपास झाला नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन अथवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा संबंधित गुंतवणूकदारांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी राज्यभरातील गुंतवणूकदार सतीश खोडवे (कोल्हापूर), धर्मा झालटे (मुंबई), श्रीधर चव्हाण (पुणे), अशोक विघ्ने (बीड), रोहिणी दिवटे (नागपूर), नागेश लवटे (सांगली), अस्लम शेख (नगर), गणपत कोबल (मुंबई) आदी उपस्थित होते.

पोलिसांबद्दल संशय व्यक्त
बिग्मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक सोमनाथ राऊत, सोनिया राऊत व अन्य सात जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यावेळेला बारा ठेवीदारांनी एकत्र फिर्याद दिलेली आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले तरीही पोलीस तपास करायला तयार नाही म्हणून आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे तसेच संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा तसेच या कंपनीबरोबर ज्या बँकेने करार केलेला आहे, त्या आयसीआय बँकेच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे अशी आम्ही मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबरीने नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचीसुद्धा भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी जे काही नियम व अटी आहेत, त्याचे तंतोतंत पालन करून त्यांच्यावर त्या पद्धतीचे गुन्हेसुध्दा दाखल करावे व कारवाई करावी, अशी आम्ही मागणी केली आहे. या वेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी निश्‍चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले असल्याचे ठेवीदारांनी यावेळी सांगितले.

कर्मचार्‍यांच्या चौकशीची मागणी
या राऊत नामक व्यक्तीने लोकांचा विश्‍वास संपादन करून कोट्यवधी रुपयांचा गंडा सर्वसामान्य लोकांना घातलेला आहे. साधारण राज्यभरात यामध्ये पंधराशे गुंतवणूकदार असून शंभर कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी या माध्यमातून केलेला आहे तसेच दोन हजार पतसंस्थासुद्धा यामध्ये अडकलेल्या आहेत. त्यांचे सुद्धा पैसे यामध्ये अडकलेले आहेत. या कंपनीमध्ये काम करणार्‍या वंदना पालवे या मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांचा ड्रायव्हर भारत सोनकांबळे, ऑफिस बॉय प्रविण खेडकर याच्या नावे बँक खाते करून आर्थिक व्यवहारासाठी वापरली गेलेली आहे, याचीसुद्धा सर्व प्रकारची चौकशी करावी अशी मागणी आम्ही केली असल्याचे ठेवीदारांनी सांगितले तसेच ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे, या गुंतवणूकदारांनी आता एकत्रितपणे येऊन सर्वांना निवेदन सुद्धा दिलेले आहे. आम्ही लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आम्ही या प्रकरणासंदर्भामध्ये विशेष तपास म्हणजेच एसआयटीमार्फत तपास करावा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच आम्ही केंद्र सरकारकडे सुद्धा या संदर्भामध्ये दाद मागणार असून या प्रकरणासंदर्भामध्ये गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल याकरिता सुद्धा आम्ही सर्व संबंधित ठिकाणी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एका गुंतवणूकदाराचा मृत्यू
नाशिक येथील अनिल जाधव नावाच्या एका गुंतवणूकदाराचा आर्थिक व मानसिक दबावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन काही दिवसांपूर्वीची त्यांचा मृत्यू झालेला आहे, ही बाब अतिशय गंभीर असून या संदर्भामध्ये आम्ही आता वेगळा गुन्हा दाखल करण्याच्यासंदर्भात विचार सुद्धा सुरू केला असल्याचे ठेवीदारांनी यावेळी सांगितले.

COMMENTS