प्रखर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल ते म्हणजे लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज होय. राजा असूनही आणि सत्ता असूनही तिच

प्रखर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल ते म्हणजे लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज होय. राजा असूनही आणि सत्ता असूनही तिचा वापर केवळ सर्वसामान्यांचे, तळागाळातील जनतेचे कल्याण कसे करता येईल यासाठी तिचा वापर करणारा राजा दुर्मिळच. खरंतर शाहू महाराज केवळ राजे नव्हते तर, ते काळाच्या कितीतरी पुढे होते. दूरदर्शी असणारे राजे यांनी शैक्षणिक क्षेत्रात जशी क्रांती घडवली तशीच क्रांती त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील घडवली. ज्या काळात अस्पृश्यता पाळली जात होती, त्या काळात त्यांनी शुद्रातिशुद्रांना शिक्षण दिले, त्यांना नोकर्या दिल्या, त्यांना व्यवसाय काढून दिले, आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यामानाने ही मोठी क्रांती होती. आपल्या कोल्हापूर संस्थानात 21 सप्टेंबर 1917 रोजी खास सक्तीच्या शिक्षणाचा कायदाचा जाहीरनामा काढून प्रसिद्ध केला. त्यामागे केवळ हा वंचित शोषित-पीडित समाज शिक्षित झाला पाहिजे ही तळमळ होती. लोककल्याणाचा वसा शाहू महाराजांनी आपल्या हयातभर जोपासला. अशा या लोकराजाचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला. तर वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच 2 एप्रिल 1894 मध्ये शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सुत्रे हातात घेतली. त्यानंतर 11 व्या दिवशीच म्हणजे 13 एप्रिल 1894 रोजी त्यांनी हुजूर ऑफिस नावाचं नवीन सचिवालय सुरू केलं. कामाची सुसूत्रता आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी शाहू महाराजांनी विसाव्या वर्षी घेतलेले निर्णय थक्क करतात. 1894 ते 1922 अशा अवघ्या 28 वर्षांच्या कारकीर्दीत शाहू महाराजांनी लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य दिले. त्यांनी या कारकिर्दीत शेती, जलसिंचन, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, या सर्वच क्षेत्रात केलेली कामगिरी चकीत करणारी आहे. या क्षेत्रात त्यांनी केलेली कामे, त्यासाठी घेतलेले निर्णय त्यांच्या बुद्धीमत्तेची आणि दूरदृष्टीची साक्ष देेतात. शाहू महाराज यांनी महात्मा फुले यांचा विचाराचा घेतलेला वसा आयुष्यभर जपला. फुले जसे बंडखोर समाजसुधारक होते, त्याचप्रमाणे शाहू महाराज यांनी क्रांतीकारी विचारांची सातत्याने जोपासना केली. बहुजन समाजाला शिक्षण, उद्योग, नोकरी, क्रीडा, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. शिक्षणाचे महत्व स्पष्ट करतांना राजर्षी शाहू महाराज खामगाव येथील 27 डिसेंबर 1917 रोजी केलेल्या भाषणात म्हणतात, शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी बहूजन समाजाच्या मुलांसाठी मोफत वसतिगृहे काढून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कठोर उपाययोजना केल्या. त्यासाठी समाजातील उच्चवर्णीयांचा त्यांना रोष पत्कारावा लागला, मात्र त्यांनी माघार घेतली नाही. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज एक आगळे-वेगळे राजे होते. त्यांनी आपल्या संस्थानात कल्याणकारी राज्याला महत्व देत तसे निर्णय घेतले. आणि त्याची अंमलबजावणी केली. त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या वतीने अनेक वृत्तपत्रांना आर्थिक मदत दिली. 1896चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ’असा राजा होणे नाही’ असेच कोल्हापूरच्या प्रजेला वाटत होते. त्यांना आपल्या प्रजेप्रती कणव होती, त्यांच्या विकासाची त्यांची धडपड होती. त्यामुळे असा लोककल्याणकारी राजा होणे नाही…!

COMMENTS