जगातील दुसरे महायुद्ध हे जवळपास सहा वर्षे चालले. या सहा वर्षात जगाने जो विनाश अनुभवला, त्यात, जगाच्या स्थायी मालमत्तेचा तर विनाश झालाच; परंतु, मा
जगातील दुसरे महायुद्ध हे जवळपास सहा वर्षे चालले. या सहा वर्षात जगाने जो विनाश अनुभवला, त्यात, जगाच्या स्थायी मालमत्तेचा तर विनाश झालाच; परंतु, मानवी संहार मोठ्या प्रमाणात झाला. या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांना उध्वस्त केल्यानंतरच, हे महायुद्ध थांबले. परंतु, या विनाशातून जगाने ज्या गोष्टी शिकून घेतल्या, त्यामध्ये, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता किंवा जागतिक शांतता! यासाठी जगाने दोन प्रकारच्या गोष्टींचा अवलंब केला आहे. पहिली म्हणजे जागतिक शांतता आणि दुसरे म्हणजे प्रत्येक देशाची सार्वभौमता. अर्थात, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया हे दोन देश जगाची महासत्ता म्हणून पुढे आले. या दोन्ही देशांचं सैन्यबळ आणि नव्या तंत्रज्ञानाने त्यांनी शोधून काढलेली अण्वस्त्रे. यामुळे, जग केव्हाही विनाशाच्या कगारावर असल्याची भावना राहील. या दोन महासत्तांनी दोन विचारसरणीचंही आणि दोन अर्थव्यवस्थांचेही प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये, अमेरिका या महासत्तेने भांडवलशाहीची बाजू घेतली; तर, रशिया सारख्या महासत्तेने साम्यवादाची बाजू घेतली. या दोन विचारसरणीमुळे जग सतत शीतयुद्धाच्या कगारवर कायम राहीले. महायुद्ध संपल्यानंतर जगामध्ये जे शीतयुद्ध सुरू राहिले, त्या शीतयुद्धाने अनेक वेळा महायुद्धाची परिस्थिती निर्माण केली; परंतु, या दोन्ही महासत्तांच्या सत्ताधाऱ्यांनी त्या त्या काळामध्ये सामंजस्य दाखवलं आणि एक पाऊल मागे घेत, या दोन्ही महासत्तांनी वेळोवेळी जगाच्या शांततेचा किंवा जागतिक शांततेचा माहौल जगामध्ये कायम ठेवला. परंतु, गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन आणि इसराइल आणि पॅलेस्टीन या दोन भूमीवर सुरू असलेले युद्ध, हे जगाला महायुद्धाच्याकडे घेऊन गेले आहे. अर्थात, अनेक विचारवंतांनी तिसऱ्या महायुद्धात आपण प्रवेश केला आहे; असे अनेक वेळा म्हटले असले तरी, तशी परिस्थिती अजून नाही. परंतु, काल युक्रेंनने रशिया सारख्या बलाढ्य देशावर विमान सदृश्य आठ ड्रोन हल्ले केले. ज्यामधून ९/११ म्हणजे अमेरिकेच्या पेंटागॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जे हल्ले विमानातून झाले होते, त्याच हल्ल्यांची आठवण येईल, असे हे विमान सदृश्य ड्रोन मधून हल्ले चढवण्यात आले. अर्थात, या हल्ल्यांना रशिया उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; हे देखील तितकेच सत्य आहे! त्यामुळे जग अधिकाधिक विनाशाकडे आणि हिंसाचाराकडे चालले. अशाच काळामध्ये जगाच्या महासत्तांची देखील स्थिती अस्थिर बनली आहे. महासत्ता या देखील एकाधिकारशाही जोपासणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या हातात एकवटल्या आहेत. हे नवे सत्ताधीश केवळ राजकीय एकाधिकारशाही गाजवत नाही; तर, ते आर्थिक एकाधिकारशाही देखील निर्माण करीत आहेत. ही आर्थिक एकाधिकारकशाही जगाला काही मोजक्या लोकांच्या हातात सर्व अर्थकारण देऊन, जगाच्या इतर नागरिकांना रोजगार आणि इतर सर्व सुविधांपासून वंचित करून, त्या नागरिकांना – कदाचित त्यांचा – संहार करणे किंवा विनाश करीत आहे काय? अशी भावना या जागतिक शांततेच्या आवश्यकता असणाऱ्या काळात मनात आल्याशिवाय राहत नाही. रशिया, हा देखील एक प्रकारे एकाधिकारकशाहीकडे झुकलेला देश आहे. जगात सर्वप्रथम पुतीन यांनीच एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना भांडवलदारीचे बळ मिळाले. परंतु, भांडवलदारी देश आणि पारंपारिक साम्यवादी प्रभावाची सत्ता असलेला रशिया, यामध्ये मात्र अजूनही समन्वय झालेला नाही. ही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणता येईल. कारण, राजकीय एकाधिकारशाही असलेल्या दोन सत्ता जर एकमेकांशी समविचारी होण्याचा प्रयत्न करीत राहिल्या, तर, जग अधिक एकाधिकारशाहीकडे मार्गक्रमण करेल! परंतु, दोन प्रकारच्या विचारसरणी अजूनही जगात असताना, जगाच्या नागरिकांना मात्र हवेवर सोडले जात आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्ध देखील हेच दर्शवतात. अशा प्रकारच्या युद्धांमध्ये विनाश आणि विनाश या पलीकडे काहीही नाही! परंतु, युक्रेन ने मात्र काल हद्दच केली. अमेरिकन बनावटीचे असलेले जवळपास आठ ड्रोन हल्ले चढवले. हे सर्वच ड्रोन विमान सदृश्य होते. त्यामुळे, रशियन सैन्यालाही एक प्रकारे ते कळलं नाही. हे विमान आहेत की ड्रोन! परंतु, ड्रोन हल्ल्यांना निष्प्रभ करण्यात रशियन सैन्य मात्र अपयशी ठरलं. हे वास्तव आहे. अर्थात, अशा प्रकारचे हल्ले प्रतिहल्ले किंवा युद्धाची परिस्थिती, जगातून लवकरात लवकर संपुष्टात यावी, यासाठी जगभरातल्या नागरिकांना देखील चिंता आहे. कारण, नागरी जीवन जगभरात खूप असुरक्षित झाले आहे. नागरी जीवनाला आवश्यक असणारा रोजगार, शिक्षण, आरोग्य या सुविधा देखील कोलमडताना दिसत आहेत. त्यामुळे जगाच्या नागरिकांना शांततेने जगण्यासाठी आणि जगविणसाठी पहिली जबाबदारी, ही जगातील विविध देशांच्या सत्ताधाऱ्यांची आहे! कारण, कोणत्याही देशातला सत्ताधारी, हा त्या त्या देशातील नागरिकांचा पालक असतो. म्हणूनच सरकारला मायबाप सरकार म्हटले जाते. मायबाप सरकार असलेल्या जगातील सर्व सरकारांनी आता नागरिकांची काळजी वाहण्यासाठी युद्ध सदृश्य परिस्थिती तर थांबवावीच; परंतु, प्रत्यक्षात सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणावे! यामध्ये कोणतेही देशाने आपल्या क्षेपणास्त्रांचा किंवा अण्वस्त्रांचा व्यवसाय करू नये. शेवटी मानवी जीवन शांततेत राहणं, हीच शांततामय सहजीवनासाठी जगाची पहिली अट आणि गरज आहे!
COMMENTS