डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना चैत्यभूमी बंद करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला आनंदराज आंबेडकर यांनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना चैत्यभूमी बंद करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला आनंदराज आंबेडकर यांनी खुले आव्हान देऊन विरोध केला. आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या अनुयायांनी कोणताही निर्बंध लक्षात न घेता चैत्यभूमीवर दाखल व्हा, असे थेट फर्मान सोडले आहे; तर त्याचवेळी ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुरेशा नसलेल्या रेल्वे, एसटी चा संप आणि कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता बाबासाहेबांच्या अनुयायांनी चैत्यभूमीवर न येण्यातच शहाणपण राहील असा सल्ला दिला आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात राजकीय भूमिकेवरून काही मतभेद असल्याचे यापूर्वीच आपल्याला दिसून आलें असले तरी सामाजिक पातळीवर त्यांच्यात मतभेद असल्याचे कधीच दिसले नाही! परंतु, पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाने काढलेल्या आदेशावरून दोन्ही बंधूतील मतभेद अनुयायांना बुचकळ्यात पाडणारे आहे. आनंदराज आंबेडकर यांनी शासनाच्या आदेशाला न जुमानण्याची घेतलेली भूमिका ही तुलनात्मक स्तरावर त्यांनी घेतलेली आहे; म्हणजे मंदिरे उघडली गेली, अनेक सभा-संम्मेलने होताहेत, बहुतेक याचकाळात नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला परवानगी देण्यात आली, थोडक्यात सांगायचे म्हणजे, कोरोनाचा कहर ओसरला तरीही राज्य सरकार सलग तिसऱ्यांदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना मज्जाव करत असण्यावर त्यांना रोष आहे. असे असले तरी एक मात्र आवर्जून सांगायला हवे की, आनंदराज यांनी ज्या गोष्टींचे तुलनात्मक उदाहरण दिले आहे, त्याठिकाणी असणारी गर्दी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांची संख्या यात प्रचंड तफावत असते. चैत्यभूमी, दीक्षाभूमी, महाडचे चवदार तळे, भीमा-कोरेगाव यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवर दर्शन घेणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसभरात ३० ते ३५ लाखांच्या दरम्यान असते. त्यामुळे, एवढ्या मोठ्या प्रमाणात देश-विदेशातून येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करणे फारसे हिताचे ठरणार नाही; अशा प्रकारच्या शासन आदेशाविरोधात लढा देण्याची शक्ती आंबेडकरी अनुयायांमध्ये नक्कीच असली तरी सध्याचा काळ पाहता तसे न करणे हे अधिक चांगले राहील. बहुधा, ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा अनुभव आणि विचार करण्याची वस्तुनिष्ठ पध्दत अधिक व्यापक असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय अधिक प्रशंसनीय आहे, असे मला वाटते. गेली दोन वर्षे आपण म्हणजे भारतीय लोक एकप्रकारचे बंदिस्त जीवन जगत असल्याने अशा बंदिस्त जीवनावर शासन स्तरावरून लादले जाणारे निर्बंध असहनीय ठरू शकतात. त्यामुळे, तात्कालिक काही प्रतिक्रिया आक्रमकपणे येणे अपेक्षित आहे. मात्र, जगभरातील उद्भवलेली स्थिती पाहता आणि आता त्यात नव्या व्हेरियंटचा येऊ घातलेला संभाव्य उद्रेक लक्षात घेऊन खेड्यापाड्यातून येणाऱ्या अनुयायांना अडचणीत ढकलणे योग्य होणार नाही, त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका ही संमजस भूमिका असून त्यावर अनुयायांनी अंमलबजावणी करायला हवी, असे आम्हाला वाटते. बाबासाहेबांचे अनुयायी हे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी तर येतातच पण त्याहीपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्ञान संपादन करण्याचा सर्वोच्च गुण त्यांनी अंगिकारल्याने चैत्यभूमीवर करोडो रूपयांची उलाढाल केवळ ग्रंथ खरेदी-विक्रीतून होते. नव्या ज्ञानाला कायम आसुलेला आंबेडकर अनुयायी विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत विचारांचा पाईक आहे; त्यामुळे हे करोडो अनुयायी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा तर्कशुद्ध विचारातून घेतलेला निर्णय अंमलात आणतील, याची आम्हाला शतप्रतिशत खात्री आहे!
COMMENTS