Homeताज्या बातम्यासंपादकीय

अखेर सरकारला जाग आली !

महाराष्ट्रामध्ये बाल अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर सरकारला जाग आल्याचे दिसून आले आहे. उशीरा का होईना सरकारने दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले. एक म्हण

उपयुक्तता आणि राजकारण
नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचा अन्वयार्थ
निवडणुकीचे गाजर आणि घोषणांचा पाऊस

महाराष्ट्रामध्ये बाल अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर सरकारला जाग आल्याचे दिसून आले आहे. उशीरा का होईना सरकारने दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले. एक म्हणजे राज्यात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा. जर शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यास त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा तर दुसरा निर्णय म्हणजे मुख्याध्यापकापासून, शिक्षक, सफाई कर्मचार्‍यांसह शाळा संबंधित सर्वांची चारित्र्य पडताळणी करण्याचा. खरंतर राज्य चालवत असतांना असे महत्वपूर्ण निर्णय आधीच घेण्याची गरज होती. मात्र घटना घडल्यानंतर आणि जनतेचा उद्रेकानंतर असे निर्णय घेण्यात येतात, हीच खरी खेदाची बाब आहे. भारतासारख्या देशात घटना घडल्यानंतर जाग येते, ही सवय मोडीत काढण्याची खरी गरज आहे. घटना घडण्यापूर्वी त्यावर उपायययोजना करण्याची खरी गरज असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. आजमितीस बदलापूर येथील ज्या शाळेत ही घटना घडली, त्या शाळेत जर शाळा प्रशासनाने सर्व बाबींची तपासणी करूनच बाबींची पूर्तता करूनच सर्व बाबी केल्या असत्या तर, अशी घटना घडली नसती.

खरंतर लहान मुलींची जबाबदारी ही शाळेत असणार्‍या मावशीकडेच असायला हवी होती. तरी देखील तो नराधम त्या मुलींना वाशरूम घेवून जायचा, आणि शाळा प्रशासनाला देखील या बाबी माहित असून देखील ते त्याला मूकसंमती देत होते, यावरूनच शाळेची मानसिकता लक्षात येते. त्यामुळे राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला असला तरी, गेल्या वर्षभरांत अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागतील याची शाश्‍वती नाही. त्यासोबतच चारित्र्यपडताळणी. चारित्र्यपडताळणी देखील शंभर टक्के होईल की नाही, यासंदर्भात शक्यता आहे. कारण बदल करायचा असल्यास त्यासाठी मानसिक तयारी असायला हवी, आणि तीच मानसिक तयारी शाळा प्रशासनाची नसल्याचे दिसून येते. काही अपवादात्मक शाळा सोडल्यास, त्यांनी केलेल्या सुधारणा, त्यांनी राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रम याची दखल घेवून त्यांना वंदन केल्याशिवाय राहवत नाही. मात्र काही शाळा केवळ चालवायच्या म्हणून चालवल्या जातात. त्यात शिक्षकांना देखील कोणताही उत्साह नसतो. रोज शाळेत आले की, तोच अभ्याक्रम पढवणे, आणि आपले काम संपवल्याचा अविर्भाव आणणे, असेच सुरू दिसते. खरंतर शिक्षक या शब्दामध्येच अनेक छटा आहेत. त्यामध्ये केवळ शिस्त, क्षमा, करूणा असा शिक्षकाचा अर्थ करता येणार नाही. तर शिक्षक हा हाडामासाचा जिवंत प्राणी असून, तो अनेक गोळ्यांना आकार देतो. संस्कार देतो. त्या विद्यार्थ्यांमध्ये सजृनशीलता निर्माण करतो, त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देतो. विद्यार्थ्यांमधील अनेक बारकावे ते हेरतो आणि त्याला प्रोत्साहन देतो. मात्र आजमितीस ही सजृनशीलता हरवलेली दिसून येते. शिक्षक म्हणजे वर्गात येणे, आपल्या विषयाचे अभ्यासक्रम संपवणे इतकीच बाब उरली आहे. त्यामुळे शालेय विभागाने या सर्व बाबींची झाडाझडती घेण्याची गरज आहे. चारित्र्य पडताळणी केल्यानंतर किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर देखील अत्याचाराच्या घटना थांबतील असे नाही, मात्र त्या काही प्रमाणात कमी होतील. मात्र अशा घटना घडूच नये, यासाठी मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. तोच बदल शाश्‍वत असेल. कारण सीसीटीव्ही, चारित्र्य पडताळणी या बाह्य बाबी झाल्या. मात्र अंतमर्नाचे काय, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे अंतर्मन बदलण्याचे गरज आहे. तसे संस्कार होण्याची गरज आहे. खरंतर बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली आहे, त्याची मानसिकता तपासण्याची गरज आहे. कारण 4 आणि 6 वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करतांना त्याच्या मनाला काहीच कसे वाटले नाही, आपल्या घरात आई-बहीण असेल, आपल्या भावाला, काकाला मुलगी असेल, असा विचार त्याच्या मनात का शिवला नाही. शिवाय असे कृत्य केल्यास आपण सहीसलामत सुटू असे त्याला वाटलेच कसे. त्यामुळे या संपूर्ण बाबींचा उहापोह होण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS