नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी कुठलाही राजकीय घात, दगाफटका किंवा क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी महायुतीने अभूतपूर्

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी कुठलाही राजकीय घात, दगाफटका किंवा क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी महायुतीने अभूतपूर्व खबरदारी घेतली असून, मतदानाच्या आदल्या रात्री सर्व मतदारांचा मुक्काम थेट लातूरमध्ये ठेवण्यात आला आहे. सहलीहून परतल्यानंतर नगरसेवकांना नांदेडमध्ये मुक्त संचाराची संधी न देता त्यांना थेट शेजारील जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी सत्ताधार्यांची धाकधूक वाढल्याचे चित्र दिसत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचे पारडे जड मानले जात असले तरी, निवडणुकीत शेवटच्या क्षणी घडणार्या राजकीय चमत्कारांची परंपरा लक्षात घेता महायुतीने कोणताही धोका पत्करण्यास नकार दिला आहे. याच कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांना ‘सुरक्षित स्थळी’ ठेवण्यात आले होते. आता मतदानाच्या पूर्वसंध्येला हे सर्व मतदार थेट लातूरमध्ये दाखल होणार असून, तेथूनच गुरुवारी सकाळी एकत्रित ताफ्याने मतदान केंद्रावर आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधकांचा संपर्क, दबाव किंवा आमिष यांना पूर्णविराम देण्यासाठीच ही अभेद्य कोंडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लातूरमधील मुक्कामादरम्यान ज्येष्ठ नेत्यांकडून मतदारांना मतदानाच्या तांत्रिक प्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. पसंतीक्रम कसा नोंदवायचा, कोणती चूक टाळायची, एकही मत बाद होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची, याचे बारकाईने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक मत सोन्याच्या भावात मोजले जात असल्याने भाजपने ‘मायक्रो प्लॅनिंग’वर भर दिला असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत मात्र अद्याप संभ्रमाचे वातावरण कायम आहे. काँग्रेसने स्वतःचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा अर्ज मागे घेतल्यानंतर ठाकरे गट समर्थित अपक्ष उमेदवार कृष्णा आष्टीकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. मात्र, जिल्ह्यातील सर्वाधिक ९२ मतदार असलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा असून, हे सर्व मतदार महाविकास आघाडीचा धर्म पाळणार की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृष्णा आष्टीकर यांना पाठिंबा जाहीर झाला असला तरी ठाकरे गटातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भूमिकेमुळे अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसची मते शंभर टक्के एका बाजूला जातील, याची खात्री कोणीही देण्यास तयार नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनीही मैदान सोडण्यास नकार दिला असून, त्रिकोणी लढतीमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मताचे महत्त्व वाढले असून, याच कारणामुळे महायुतीने कोणताही धोका न पत्करता ‘ऑपरेशन सेफ वोट’ राबविल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर एकूण ४५२ लोकप्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २४४ महिला आणि २०८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असणार आहे. मतदानानंतर सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या या लढतीत केवळ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागलेले नाही, तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत शिस्तीचीही कसोटी लागणार आहे. त्यामुळे लातूरमधील हा मुक्काम केवळ विश्रांतीसाठी नसून, विजयाचा शेवटचा पहारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

COMMENTS