गोंदवले / वार्ताहर : नरबटवाडी (ढाकणी) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नरबट व त्यांचा मुलगा विश्वास नरबट यांच्या दुचाकीला ढाकणी फाट्यावर अज्
गोंदवले / वार्ताहर : नरबटवाडी (ढाकणी) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नरबट व त्यांचा मुलगा विश्वास नरबट यांच्या दुचाकीला ढाकणी फाट्यावर अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्राचा अंत झाल्याची घटना घडली आहे. पिता पुत्रावर एकाच सरणावर शोकाकुल वातावरणात दहन देण्यात आले.
याबाबतीत अधिक माहिती अशी की, पोपट तातोबा नरबट (वय 52) व त्यांचा मुलगा विश्वास पोपट नरबट (वय 13, दोघे रा. नरबटवाडी, ता. माण) हे काल सायंकाळी दुचाकीवरून म्हसवड-मायणी रस्त्याने म्हसवडकडून मायणीच्या दिशेने निघाले होते. ढाकणी फाटा येथे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. यास ट्रॅक्टर जोडलेला नव्हता. रस्त्यावर उभ्या असलेल्या या ट्रॉलीला दुचाकी पास करत असताना समोरुन येणार्या पांढर्या रंगाचे बोलेरो गाडीवरील चालकाने जोराची धडक दिली. धडकेननंतर बोलेरो गाडी न थांबता निघून गेली. या धडकेत दुचाकीवरील विश्वास पोपट नरबट यास जोराचा मार बसल्याने तो जागीच ठार झाला. त्याचे वडील पोपट तातोबा नरबट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना रस्त्यात ते मयत झाले.
या घटनेची फिर्याद मयत पोपट तातोबा नरबट याचा चुलत भाऊ सुरेश मारुती नरबट (वय 38, रा. नरबटवाडी, ता. माण) यांनी दिली आहे. या फिर्यादीमध्ये त्यांनी ट्रॅक्टर मालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व हलगरजेपणाने ट्रॉली रस्त्यावर उभी केल्याने तसेच पांढर्या रंगाची बोलेरो गाडीवरील चालकांनी धडक दिल्याने मुलगा व वडील यांचे मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद करून त्यांचे विरोधात तक्रार दिली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते पोपट नरबट हे सामाजिक कार्यात हिरेरिने सहभाग घेत असत नरबटवाडी येथे अद्ययावत वाचनालय उभे करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. प्राथमिक शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पत्नी आशा वर्कर म्हणून आरोग्य विभागात काम करत असताना कोरोना काळात पत्नी बरोबर ढाकणी नरबटवाडी येथे फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्रामाणिकपणे काम केले आहे.
मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ढाकणी येथे मुलगा विश्वास यास वह्या आणण्यासाठी गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातानंतर मुलगा निपचित पडून आहे, हे लक्षात येताच मुलासाठी वडिल गंभीर जखमी असतानाही अरे कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा, असा टाहो फोडत होते. यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून जात होते. याप्रसंगी ढाकणी येथील धिरज सरतापे यांनी प्राथमिक मदत मिळावी म्हणून खुप प्रयत्न केले.
शेवटी पोपटराव नरबट यांच्यावर काळाने घाला घातल्याने दोघाही पिता पुत्रावर नरबटवाडी येथे एकाच सरणावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे. या घटनेने ढाकणी नरबटवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि बाजीराव ढेकळे करत आहेत.
COMMENTS