Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवीप्रदान समारंभ देवळाली प्रवरा : राज्य सरकार शेतकऱ्यांना जलसुरक्षा आणि उर्जासुरक्षा देण्यासाठी विविध योजना राब

आ. काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात
गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन
जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवीप्रदान समारंभ

देवळाली प्रवरा : राज्य सरकार शेतकऱ्यांना जलसुरक्षा आणि उर्जासुरक्षा देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. उर्जा सुरक्षा योजनेअंतर्गत या वर्षाअखेरीस शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ आणि खर्चात 25 टक्के बचत होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

समारंभात मार्गदर्शन करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या विकासासाठी करण्याचे आवाहन केले. नवोन्मेष, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांच्या माध्यमातून शाश्वत शेती विकास साधण्यावर त्यांनी भर दिला. शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाज उन्नतीसाठी व्हावा, असेही त्यांनी सांगितले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या शोधात न राहता कृषि उद्योजक बनण्याचे आवाहन केले. अन्नप्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषि पर्यटन, स्टार्टअप्स आणि सेंद्रिय शेती या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ अशोक कुमार सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषि क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत शेती साध्य करण्याची गरज व्यक्त केली.

कुलगुरू विलास खर्चे यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करताना सांगितले की, विद्यापीठाने आतापर्यंत 320 पिकांचे वाण, 56 कृषि अवजारे आणि 1925 शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे. विद्यापीठाच्या संशोधनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 3 लाख 98 हजार कोटी रुपयांची भर पडल्याचे त्यांनी सांगितले. या पदवीप्रदान समारंभात 74 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 346 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि 4,182 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदकांनी गौरविण्यात आले.

पदवीप्रदान समारंभाला खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. मोनीका राजळे, जिल्हा सहकारी बँक संचालक अक्षय कर्डिले,   जिल्हाधिकारी पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, विद्यापीठ अभियंता  मिलिंद ढोके, माजी कुलगुरु डॉ. सुभाष पुरी, डॉ. आर.बी. देशमुख, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, डॉ. व्यंकटेश मायंदे, माजी आ.चंद्रशेखर कदम, डॉ. हरी मोरे, कृषिभूषण सुरसिंग पवार, कृषी, प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व शेतकरी   उपस्थित होते.

मुख्यत्र्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी

 राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी एकूण 4,602 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

COMMENTS