महापालिकेच्या आयुक्तांनी शहराचे विद्रुपीकरण रोखावेनांदेड : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी चढाओढ करून विजयी उ

महापालिकेच्या आयुक्तांनी शहराचे विद्रुपीकरण रोखावे
नांदेड : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी चढाओढ करून विजयी उमेदवाराचे बॅनर्स लावण्याची एका प्रकारे स्पर्धा केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर वाहतुकीला अडथळे निर्माण होतील अशा पद्धतीने बॅनर्स लावले असले तरी महापालिका प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे. यामुळे नांदेडकर संताप व्यक्त करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नांदेड शहर सध्या विजयाच्या बॅनर्सनी अक्षरशः विद्रूप झाले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांत विजयी ठरलेल्या उमेदवारांनी शहरभर उभारलेल्या जाहिरातबाजीच्या बॅनर्सनी सार्वजनिक रस्ते, चौक, वसाहती आणि महत्त्वाच्या मार्गांवर अतिक्रमण केले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीतील विजयाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही; मात्र तो उत्सव सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक नियम आणि शहराच्या सौंदर्यावर घाला घालणारा असेल, तर तो उत्सव नव्हे-तर उन्माद ठरतो.
शहरातील मध्यवर्ती भागातील स्नेहनगर पोलीस वसाहतीजवळील पेट्रोल पंपाच्या परिसरात रस्त्याच्या मधोमध उभारलेले बॅनर्स वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. दृष्टीआड येणारे हे बॅनर्स दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचे लक्ष विचलित करतात. क्षणभर जरी दुर्लक्ष झाले, तरी अपघात अटळ आहेत. जबाबदारी कुणाची? अपघात झाल्यावर दोष कोणावर ढकलायचा-बॅनर्स लावणार्यांवर की डोळेझाक करणार्या प्रशासनावर ? सायन्स कॉलेजकडे जाणार्या रस्त्यावरही हेच चित्र आहे. राजकीय पक्षांच्या विजयी उमेदवारांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेले भलेमोठे बॅनर्स वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण करत आहेत. विद्यार्थी, शिक्षक, रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा-सर्वांसाठी हा मार्ग महत्त्वाचा; पण राजकीय मिरवणुकीच्या हौसेपुढे नागरिकांच्या सोयी-सुरक्षिततेला शून्य किंमत दिली जात आहे.
पीपल्स कॉलेज रोडवर तर बॅनर्सची अक्षरशः आतिषबाजी झाली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते स्पर्धा लावून बॅनर्स उभारत आहेत-कोण मोठा, कोण उंच, कोण जास्त! परिणामी रस्ता अरुंद, वाहतूक ठप्प आणि अपघाताचा धोका वाढलेला. हे सगळे घडत असताना पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका केवळ ‘प्रेक्षक’ बनून पाहत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे शहरातील ठिकठिकाणी लावलेल्या बॅनर्सवर कुख्यात गुन्हेगारांची छायाचित्रे झळकत आहेत. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांच्या गळ्यामध्ये पाव अर्धा किलोच्या सोन्याच्या साखळ्या चमकत आहेत. नांदेड शहरांमध्ये काही ठिकाणी तडीपार कार्यकर्त्यांचे फोटोही खुलेआम लावलेले दिसतात. कायद्याची अशी थट्टा कशी सहन केली जातेक्ष? कायदा-सुव्यवस्थेचा बडगा उचलणारे पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे, हा प्रश्न ऐरणीवर आहे. नांदेड शहरांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीवर कोणत्याही प्रकारचा अंकुश दिसून येत नाही.
महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी यापूर्वी परवानगीशिवाय लावलेल्या बॅनर्सवर कारवाई केली होती. मात्र आता सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर्स शहरभर झळकत असताना ‘परवानगी आहे की नाही’ याबाबत संभ्रम आहे. परवानगी असली तरी रस्त्याला अडथळा निर्माण करणार्या बॅनर्सना मुभा कशी? नियम सगळ्यांसाठी समान असतात की फक्त सामान्य नागरिकांसाठी? आज प्रशासनाची इच्छाशक्तीच या प्रश्नाचे उत्तर ठरवणार आहे.

COMMENTS