मुंबई महापालिके अंतर्गत असणाऱ्या बेस्ट उपक्रमातील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढी च्या निवडणुकीची चर्चा राज्यामध्ये कोणत्याही विधानसभेची होणा

मुंबई महापालिके अंतर्गत असणाऱ्या बेस्ट उपक्रमातील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढी च्या निवडणुकीची चर्चा राज्यामध्ये कोणत्याही विधानसभेची होणार नाही, एवढी चर्चा प्रसारमाध्यमांनी केली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही, त्यांना बेस्ट पतपेढीतील २१ जागांपैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. जेव्हा की ते यापूर्वी सतत सत्तेत राहिलेले आहेत. अर्थात, या निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला किंवा पॅनलला विजय मिळाल नसला तरी, याची काही निश्चित कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीत पाठवले गेलेले राज ठाकरे हे आतून तसे भाजपचेच पुरस्कर्ते आहेत, असं लपून राहिलेलं नाही. त्यामुळे राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या सोबत जरी आले, तरी, ते आतून खरे तर भाजपाशी मॅनेज आहेत. त्यामुळे निवडणुकीत पराभव झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ते थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला गेले. राजकारणात कोणतीही गोष्ट सकारण असल्याशिवाय घडत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बेस्ट उपक्रमात असलेल्या ३० हजार कर्मचाऱ्यांचे मतदान हे ठाकरेंच्या विरोधात गेलं असलं, तरी, त्याचा अर्थ असा नव्हे की, महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंचा पराभव होईल! किंबहुना, उद्धव ठाकरेंचा पराभव होईल असं मानणं अगदी चुकीचे आहे. याचं खास कारण म्हणजे बेस्ट उपक्रमात असणारा कर्मचारी वर्ग हा मध्यमवर्गीय आहे; आणि आज कोणत्याही ठिकाणी जो मध्यमवर्ग आहे, हा भौतिक साधनांसाठी किंबहुना मिळकतीसाठी नेहमीच अपेक्षा धरून राहिलेला असतो. त्यामुळे जिकडे आपल्याला काही मिळेल त्या दिशेने तो धावायला लागतो. शिवाय, बेस्ट कामगार म्हणून असणारे हे कर्मचारी, बहुतांशरित्या मुंबईच्या बाहेर राहतात. त्यांच्या मतदानाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होईल, असं मान्य अवसान घातकी आहे. कारण, हे कर्मचारी बहुतांश नवी मुंबई, कल्याण, ठाणे अशा जवळपासच्या परिसरात निवासाला असतात. त्यामुळे, ते मुंबई महानगरपालिकेचे मतदार आहेत असं समजण्याचं फार काही कारण नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत पॅनलचे प्रमुख शशांकराव यांना शरदराव या कामगार नेत्याचा वारसा आहे. शरदराव हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या बरोबरीचे नेते मानले जातात. त्यामुळे शशांकराव हे अगदी कोरी पाटी आहे, असे म्हणता येणार नाही. कामगारांमध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि त्यासोबत त्यांना भाजप आणि सरकारमधील काही मंत्र्यांचा निश्चितपणे ‘अर्थपूर्ण’ पाठिंबा मिळालेला आहे. शिवाय, राजकारणामध्ये मध्यमवर्गीय आणि जनता यांच्यामध्ये निश्चितपणे फरक असतो. मध्यमवर्ग हा नेहमीच आपल्याला काही मिळेल का, या आशेमध्ये असतो. तो अधिकाधिक मिळवण्याचा आणि जिथून ते मिळेल तिकडे वळण्याचा त्याचा एक सोपा मानसिक मार्ग त्यांनी पत्करलेला आहे. परंतु, महानगरपालिकेच्या निवडणुका या जनतेत होणाऱ्या असतात. जनता ही खाजगी कामगार जशी असते, तशी मजूर असते आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वर्गात ती वावरत असते. त्यामुळे, जनता ही अधिक प्रगल्भतेने विचार करते. जनता ही आपल्याकडे काहीतरी यावं ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी काम करणारे नेतेच आपण प्राधान्य क्रमाने निवडावे, याचा निश्चितपणे विचार करते. अर्थात, राजकीय निवडणुकांचे निकाल काही लागले असले तरी, स्थानिक जनता त्यांचे निकष ठरवूनच त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी निवडत असतात. ही गोष्ट आपल्याला अमान्य करून चालणार नाही. त्यामुळे बेस्टच्या पतपेढीत उद्धव ठाकरे यांच्या पॅनलचा पराभव झाला म्हणून महानगरपालिकेतही त्यांच्या पक्षाचा पराभव होईल, असं मानणं म्हणजे आत्मवंचना करण्यासारखे आहे. अर्थात, पराभव आणि विजय हा राजकारणामध्ये नेहमी होत असतो. परंतु, पराभवाला घेऊन एखाद्या राजकीय पक्षाला बॅनरबाजी करून डिवचणं हे राजकीय संस्कृतीत न बसणार आहे. परंतु असा थिल्लरपणा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. या थिल्लर पणाला रोखण्याचं, थांबवण्याचे काम सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाने करायला हवं. कारण, राजकारण हे कधीही स्थिर नसतं. ते नेहमीच संधी अनेकांना मिळवून देणार असतं. त्यामुळे, आज पराभव झाला तर उद्या विजय होईल, त्यामुळे विजयाच्या उन्मादात बॅनरबाजी करून एखाद्या पक्षाला डिवचणं हे खरंतर सांस्कृतिक मूल्य ढासळल्याच लक्षण आहे.

COMMENTS