पिंपळनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्हबीड । प्रतिनिधीपिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी तब

पिंपळनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
बीड । प्रतिनिधी
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी तब्बल 45 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती न लागल्याने पिंपळनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा गावात रंगू लागली असून, पीडिताने थेट बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
काळेगाव (हवेली), ता. जि. बीड येथील रहिवासी निळकंठ पि. रामचंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अशोक रामप्रसाद पवार, रामप्रसाद अर्जुन पवार, जयराम रामप्रसाद पवार व बाळू लक्ष्मण गायकवाड यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोक्यात जबर मारहाण करून गंभीर जखम केल्यानंतर पोटात चाकूचा वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात निळकंठ पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बीड येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान पिंपळनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 320/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार कुटुंबीयांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षकांनी पिंपळनेर पोलीस ठाणे प्रमुखांना आरोपींना अटक करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, प्रत्यक्षात आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपी हे गावगुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्या हातात तलवार, कुर्हाड, काठ्या, कुकरी तसेच गावठी बंदूक असल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाटपणे गावात फिरत असून, तक्रारदाराच्या मुलाला अडवून केस मागे घेण्याची धमकी देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आमचे संपूर्ण कुटुंब धोक्यात असून घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे, असे नमूद करत तक्रारदाराने आरोपींना तात्काळ अटक करून तपास जलदगतीने करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील दोन आरोपींना न्यायालयाने तात्पुरता जामीन दिला असून उर्वरित दोन आरोपी गेल्या 45 दिवसांपासून फरार आहेत. असे असतानाही पिंपळनेर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस कारवाईवर राजकीय दबाव तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत असून, आता या प्रकरणात पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS