अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे अडीच हजारावर खुल्या जागा असून, त्यावर अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत व काही जागा विकल्याही
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे अडीच हजारावर खुल्या जागा असून, त्यावर अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत व काही जागा विकल्याही गेल्या आहेत, वीट भट्ट्यांपासून अनेक व्यवसाय यावर सुरू आहेत, असा घणाघाती आरोप मनपातील सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी बुधवारी मनपाच्या महासभेत केला. मनपाच्या नगररचना विभागाने आठ दिवसात मनपाच्या मालकीच्या खुल्या जागांची यादी मला दिली तर कोणत्या जागेवर कोणाचे अतिक्रमण आहे, या पर्दाफाश करतो, असे थेट आव्हानच त्यांनी महासभेत दिले.
शिवसेनेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची महासभा ऑनलाईन बुधवारी झाली. मनपा सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने या सभेचे कामकाज झाले. मात्र, काही नगरसेवक या सभेस उपस्थित होते व त्यांनी तसेच ऑनलाईन सहभागी नगरसेवकांनी विविध नागरी समस्यांचे मुद्दे या सभेत मांडले. आयुक्त शंकर गोरे, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह उपमहापौर गणेश भोसले, नगर सचिव एस. बी. तडवी यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत सभागृह नेते अशोक बडे, नगरसेवक सचिन शिंदे, कुमार वाकळे, बाबासाहेब वाकळे, आसिफ सुलतान, पुष्पा बोरुडे तसेच ऑनलाईनद्वारे दीपाली बारस्कर आदींनी भाग घेतला. तारकपूर रस्त्यावरील साईदीप हॉस्पिटलजवळील मनपाच्या मालकीची खुली जागा सिंध हिंद सेवा मंडल चॅरिटेबल ट्रस्टला देण्याच्या विषयावरून मनपाच्या मालकीच्या शहरातील खुल्या जागांचा विषय चर्चेत आला व त्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी मनपा प्रशासनाला व नगर रचना विभागाला धारेवर धरले.
मनपा नगररचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर यांनी या सभेत बोलताना, मनपाच्या मालकीच्या सुमारे अडीच हजारावर खुल्या जागा नगर शहरात आहेत. यापैकी बाराशे जागांची मालकी मनपाच्या नावे झाली आहे व अजून तेराशेवर जागांवर मनपाची मालकी लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगताना, मनपाची हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात आलेल्या नव्या भागातील या खुल्या जागांची नोंदच मनपाकडे नसल्याचे वास्तवही त्यांनी मांडले. मात्र, आता त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
फुटाण्यासारख्या वाटता का?- शिंदे
या विषयाच्या अनुषंगाने महासभेत सुरू असलेल्या चर्चेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक शिंदे यांनी आक्रमक भूमिका मांडली. मनपाच्या मालकीच्या व चांगल्या लोकेशनच्या जागा फुटाण्यासारख्या वाटल्या गेल्या आहेत व अजूनही जात आहेत. मात्र, या जागांवर मनपाने स्वखर्चाने गाळे बांधून त्यांची विक्री केल्यास मनपाला उत्पन्नाचे चांगले साधन होईल, असे सांगून ते म्हणाले, मनपाद्वारे सामाजिक व स्वयंसेवी संस्थांना सामाजिक उपक्रमासाठी वा हॉस्पिटलसारख्या व्यावसायिक उपक्रमासाठी जागा दिल्या जातात. त्यांचे भाडे जरी मनपाला मिळत असले तरी मनपाच्या मालकीच्या जागांवर सुरू असलेल्या व सुरू होणार्या या उपक्रमांतून मनपाला काय फायदा होणार आहे? आपल्या मनपा संस्थेच्या विकासाचा विचार कोणी करणार की नाही? चाहुराणा बुद्रुक परिसरातील जागांचे बाजारभाव चौरस फुटाला पाच हजाराच्या पुढे असताना कोणीही मनपा संस्थेचे हीत न पाहता येथील जागा दिल्या जात आहेत. 85 टक्के आस्थापना खर्च असल्याने शहर विकासाला निधी उपलब्ध होत नाही, येथे विकास करू शकत नाही, असे आयुक्त सांगत असतील तर हे शहर उद्याच्या काळात बदलणार की नाही?, असा सवालही शिंदे यांनी केला.
मी सांगतो अतिक्रमणे
मनपाच्या मालकीच्या अडीच हजारावर खुल्या जागांची यादी मला द्या. या जागांपैकी कोठे विटभट्ट्या झाल्या आहेत व कोठे अन्य व्यवसायांची अतिक्रमणे झाली आहेत, याची माहिती मी मनपाचे अधिकारी व पदाधिकार्यांना त्या जागांवर नेऊन दाखवतो, असे आव्हान शिंदे यांनी सभागृहात दिले. त्यावर बोलताना नगर रचना सहायक संचालक चारठणकर यांनी येत्या 8 दिवसात या जागांची याची शिंदे यांना दिली जाईल, असे महासभेत स्पष्ट केले. दरम्यान, आता मनपातील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकानेच शहरातील मनपाच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणाला तोंड फोडल्याने सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेते याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.
COMMENTS