Homeताज्या बातम्यासंपादकीय

एन्काउंटर व्यवस्थेचा की प्रवृत्तीचा ?

व्यवस्था आणि कायदा या दोन भिन्न बाजू असल्या तरी त्यांचा महत्वाचा संबंध आहे. व्यवस्था आणि कायदा जर एकत्र आला तर अपप्रवृत्तींना धडा शिकवण्यास वेळ ल

हिट अँड रनच्या वाढत्या घटना चिंताजनक
अवैध प्रमाणपत्रे सरकारी अडचण ?
मान्सूनची सलामी

व्यवस्था आणि कायदा या दोन भिन्न बाजू असल्या तरी त्यांचा महत्वाचा संबंध आहे. व्यवस्था आणि कायदा जर एकत्र आला तर अपप्रवृत्तींना धडा शिकवण्यास वेळ लागणार नाही. मात्र व्यवस्था कायदाचा वापर आपल्या सोयीप्रमाणे करते, त्यामुळे न्याय लवकर मिळत नाही. त्यामुळे व्यवस्था आणि कायदा या दोन्ही घटकांनी हातात हात घालून काम करण्याची खरी गरज आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींचा ज्यापद्धतीने एन्काउंटर करण्यात आला, आणि त्याप्रकरणी जे प्रश्‍न उपस्थित होत आहे, त्याचे उत्तर शोधण्याची खरी गरज आहे. प्रमुख मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केतन तिरोडकर यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार बदलापूरच्या शाळेतील विश्‍वस्तांवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी ज्या अक्षय शिंदेंचा एन्काउंटर केला, तो खरंच या गुन्ह्यात सहभागी आहे का? हा महत्वाचा मुद्ा उपस्थित होत आहे. मुलींवर अत्याचार झाला, मात्र या गुन्ह्यात पोलिस संस्थेतील ट्रस्टींना का पाठीशी घालत आहे हा देखील महत्वाचा मुद्ा आहे. शिवाय आरोपीने माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना देखील भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. या संपूर्ण बाबींचा विचार करता पोलिस नेमके कुणाला पाठीशी घालत आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. बदलापूर येथील एका शाळेतील स्वच्छतागृहामध्ये दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्यानंतर त्या मुलींच्या पालकांनी या मुलींचे मेडीकल चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितल्यानंतर खरंतर पोलिसांनी गुन्हा तात्काळ नोंदवण्याची खरी गरज होती. मात्र गुन्हा नोंदवण्यास पोलिस टाळाटाळ करत होते, तसेच शाळा प्रशासनासी संपर्क साधून पुरावे नष्ट करत होते की तडजोड करत होते,

याचा अजूनही उहापोह झालेला नसतांना, संस्थाचालकांची भूमिका संशयास्पद असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याची गरज पोलिसांनी दाखवली नाही. त्यामुळे येथे व्यवस्था नेमकी कुणाला पाठिशी घालत होती, त्याचा शोध घेण्याची खरी गरज आहे. व्यवस्थेला आरोपीला अटक करण्यासाठी, संबंधित शाळा प्रशासनाची झाडाझडती घेण्यासाठी विलंब का झाला, याचीही चौकशी करण्याची खरी गरज आहे. त्यानंतर प्रश्‍न उपस्थित राहतो एन्काउंटरचा. पोलिसांनी केलेले एन्काउंटर खरे की खोटे याचा उलगडा होईल याची शक्यता नाही. कारण आत्तापर्यंत पोलिसांनी असे अनेक फेक एन्काउंटर करून त्यांना खरे भासवले आहे. त्यामुळे या एन्काउंटरवर अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत असले तरी, त्याचे सत्य समोर येईल याची शाश्‍वती नाही. व्यवस्थेचा आणखी एक पुरावा म्हणजे ज्या चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर शाळा प्रशासनाने त्या पालकांशी जो व्यवहार केला, त्यासंदर्भात संबंधित पालक देखील आवाज उठवायला तयार नाहीत. खरंतर या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. न्यायालय साक्षी, पुरावे तपासून त्याला फाशीची शिक्षा सुनावू शकत होते, मात्र पोलिसांजवळ तितकेसे महत्वपूर्ण पुरावे नसावे म्हणूनच अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे. याप्रकरणात अक्षय शिंदे पोलिसांची बंदूक हिसकावू शकतो, हे तत्थ काही परिस्थितीशी जुळणारे आणि पटणारे नाही. त्यामुळे या एन्काउंटरसंदर्भात अनेक प्रश्‍न निर्माण होत आहे. मुळात अक्षय शिंदे आरोपी होता, त्याला कायद्याने फाशीची शिक्षा देता आली असती, मात्र आजमितीस कायद्यावरचा विश्‍वास उडाल्यामुळेच तर त्याचे एन्काउंटर करण्यात आले नाही ना? की त्याचे एन्काउंटर करून पोलिस प्रशासन संबंधित संस्थेच्या कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, यासंदर्भात विविध पैलुंनी चौकशी होण्याची खरी गरज आहे. देशभरातील कायदे किचकट होत असतांना त्याच सूसुत्रता आणण्याची खरी गरज आहे. बलात्कारासारख्या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी किमान पावले उचलण्याची खरी गरज आहे. आरोपीला अटक केल्यापासून शंभर दिवसात न्यायप्रक्रिया पूर्ण होवून त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये बदलापूर प्रकरणानंतर महिला अत्याचारात तसेच चिमुरड्या मुलींवरील देखील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपींना कमी दिवसांमध्ये शिक्षा होईल, यासाठी प्रभावी कायदा करण्याची खरी गरज आहे. आज ज्या पोलिसांनी एन्काउंटर केले, ते खरे की खोटे हा भाग अलाहिदा, मात्र हीच तत्परता पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी यासोबतच संस्थाचालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी दाखवली असती तर, कदाचित या प्रकरणातील बहुतांश सत्य बाहेर आले असते. मात्र यानिमित्ताने पोलिसांच्या तपासावर संशय निर्माण होत असून, पोलिसांनी तपासातून अर्धसत्यच बाहेर आणल्याचे दिसून येत आहे. 

COMMENTS