Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणूक आणि सोशल मीडिया

राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे सोशल मीडियाला विशेष महत्व आहे. खरंतर सोशल मीडियावर होणार्‍या पोस्टमुळे जनमत प्रभावित होते. त्यातच व

गुन्हेगारीचे ‘हब’  !
दुष्काळ दारात…
शिवसेनेचा घसरता आलेख

राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे सोशल मीडियाला विशेष महत्व आहे. खरंतर सोशल मीडियावर होणार्‍या पोस्टमुळे जनमत प्रभावित होते. त्यातच वादग्रस्त होणार्‍या पोस्ट आणि त्यावर होणार्‍या घाणेरड्या कमेंट्स यामुळे सोशल मीडियावर बंधने आहेत की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांकडून व्हॉट्स अ‍ॅप सारख्या सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून असतांना फेसबूकसारख्या माध्यमांकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित होतो. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तांने पोलिसांनी व्हाट्सअ‍ॅप, युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या पाच माध्यमांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी एआय म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्सचाही वापर पोलिसांकडून केला जाणार आहे. पण व्हाट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ह्युमन इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. गुन्हा नोंदवण्याचे प्रमाण अल्प दिसून येते. त्यामुळे फेक माहिती पसरवण्यास मदत होते. वास्तविक पाहता पोलिसांनी फेक, तसेच विकृत पोस्टची तात्काळ दखल घेवून गुन्हा नोंदवण्याची गरज आहे. सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यम म्हणजे मुक्तपणे व्यक्त होण्याचे साधन. आपल्या भाव-भावना मांडण्यांचे सर्वसामान्यांचे हक्कांचे व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा उदय झाला असला तरी, आज सोशल मीडियाचे पूर्णपणे व्यावसायिकीकरण झाले आहे. सोशल मीडियाचा वापर आज सर्वांत जास्त राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते करतांना दिसून येत आहे. या माध्यमातून समाजाच्या भावना भडकाविण्याचे साधन म्हणून देखील पाहिले जात आहे. खरं तर, राजकीय पक्ष या सोशल मीडियाचा सर्रास वापर करतांना दिसून येतो. किंबहून ती त्यांची गरज आहे. आपले विचार पेरण्यासाठी, एखाद्यांचे विचार खोडून काढण्यासाठी राजकीय पक्षांनी सोशल वॉर याच सोशल मीडियावर सुरु केले आहेत. एव्हाना भारतात जर बघितले तर अनेक पक्षांकडून आपला सोशल मीडिया मजबूत करण्यात येत आहे. डिजिटल क्रांतीमुळे जग एक खेडे झाले आहे. सर्वजण एकमेकांच्या जवळ आले आहेत. संपर्क साधण्याचे, व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहिजे, तिथे, पोहचू शकतो, आणि डोकावू शकतो. मात्र याच सोशल क्रांतीमुळे माणूसकीचा संवाद कमी झाला आहे. तुम्ही नातेवाईक सण-उत्सवांच्या वेळी किंवा मित्र मंडळी, चहा जेवणांसाठी एकत्र आले तरी आपल्या हातात मोबाईल सारखा असतो. आणि त्यातून आपण बाहेरचे जग जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र जवळ बसलेले चार माणसे जाणून घेत नाही. त्यांच्यासोबत मोजकाच संवाद साधतो. थोडक्यात आपले विश्‍व हे, स्वतःभोवती गुरफुटतांना दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी या बाबींना आपल्याला लगाम घालावा लागणार आहे. सोशल मीडियाचा वापर जसा प्रसिध्दीसाठी होत आहे, तसाच तो समाजाची माथी भडकवण्यासाठी देखील होत असल्यांचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या वापरा संदर्भात विविध माध्यमांतून चर्चेला उधाण आले आहे. या सर्व चर्चा या माध्यमांचा वापर नेमका कसा करावा यावर सर्व पातळीवर होत असलेली ही चर्चा एकूणच तरुण वर्गावर घसरतांना दिसते. मात्र तरुण वर्ग हा एकंदरीत तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशा पध्दतीने हा मीडिया वापरत नाही. ज्यांना समाज व्यवस्थेत ताण-तणाव निर्माण करावयाचा असतो त्यांची उद्दिष्टे ही वेगळी असतात. साधारणत: अशा उद्दिष्टांमध्ये राजकीय सत्ता संपादन करणे किंवा टिकविणे. त्याचप्रमाणे परंपरागत सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी द्वेषमुलक विचार प्रसारीत करणे हा उद्देश असतो. अशी उद्देश असणारी माणसे ही क्वचितच तरुण वर्गातील असतात. त्यामुळे तरुण वर्गावर या सर्वच बाबींचा आरोप थेट टाकणे हे तसे पाहता बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. सोशल मीडियाद्वारे देशाच्या अखंडतेला धोका आहे, तसाच अंतर्गत देखील धोका आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरण्याचे काही नियम, धोरण आपल्याला तयार करावे लागणार आहे. कारण सोशल मीडियाचा वापर करणारी संख्या कमी नाही. ही संख्या खूप मोठी आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अनेकजण कोटयावधी व्यक्तीपर्यंत आपला व्हिडिओ, आपली पोस्ट आणि आपली मते पोहचवत आहेत. त्यातून अनेक दूरगामी परिणाम होतांना दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियाला आवर घालणे काळाची गरज असून, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन, त्यासंदर्भातील धोरण आखणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता आजमितीस सोशल मीडियावर ज्या पोस्ट पडत आहे, त्यावर अतिशय खालच्या स्तरावरच्या कमेंट्स असतात, त्याप्रकरणी गुन्हा नोंदवला तर पोलिस तपास करतात, अन्यथा अशाच वादग्रस्त पोस्ट होत राहतात.

COMMENTS