Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ लेखकांचा ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’मधून माघार

बारामतीतील गौतम अदानींच्या उपस्थितीला विरोध करत घेतला निर्णयपुणे ः राजकीय वर्तुळानंतर आता साहित्य क्षेत्रातही उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावावरू

अदानी समूहाला सर्वोच्च दिलासा
खा. शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक
गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

बारामतीतील गौतम अदानींच्या उपस्थितीला विरोध करत घेतला निर्णय
पुणे ः राजकीय वर्तुळानंतर आता साहित्य क्षेत्रातही उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. बारामती येथील ‘शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय’ या संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गौतम अदानी यांना निमंत्रण देण्यात आल्याच्या निषेधार्थ आठ नामवंत लेखकांनी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (साहित्य)’च्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भातील पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
गेल्या चार वर्षांपासून या फेलोशिपसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेल्या लेखकांनी सामूहिकरीत्या हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. नितीन रिंढे, राजीव नाईक, गणेश विसपुते, किरण येले, रणधीर शिंदे, चंद्रशेखर फणसळकर, प्रमोद मुनघाटे आणि शरद नावरे यांचा या गटात समावेश आहे. साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देणार्‍या या उपक्रमाशी आपला दीर्घकाळचा संबंध असतानाही तात्त्विक भूमिकेमुळे बाहेर पडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे लेखकांचे म्हणणे आहे. लेखकांनी आपल्या निवेदनात स्पष्ट भूमिका मांडली आहे. धार्मिक व आर्थिक पक्षपात, तसेच सध्याच्या राजकीय सत्तेशी संबंधित विचारसरणीला आपण विरोध करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गौतम अदानी यांचे या सत्ताकेंद्रांशी असलेले निकटचे संबंध पाहता, अशा व्यक्तीला संस्थेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे आपल्याला मान्य नसल्याचे लेखकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच नैतिकतेच्या भूमिकेतून फेलोशिपच्या मार्गदर्शक पदावर राहणे शक्य नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
लेखकांनी आपल्या पत्रात यशवंतराव चव्हाण सेंटर आणि फेलोशिपच्या आयोजकांबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. फेलोशिपदरम्यान पूर्ण स्वातंत्र्य, कोणताही वैचारिक दबाव नसलेले वातावरण आणि सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही, साहित्यनिर्मितीचा उपक्रम आणि सार्वजनिक पातळीवर दिला जाणारा संदेश यामध्ये विसंगती निर्माण होत असल्याची भावना असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय गरजा, निधी उभारणीची आवश्यकता आणि संस्थात्मक वास्तव यांची जाणीव असूनही, साहित्यिक मार्गदर्शक म्हणून फेलो लेखकांशी नैतिक मूल्ये, जीवनदृष्टी आणि सामाजिक जाणीवांवर संवाद साधताना आपली भूमिका विसंगत ठरेल, असे लेखकांचे मत आहे. त्यामुळे जड अंतःकरणाने का होईना, या उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

असे कोणतेही पत्र अद्याप आलेले नाही ः खा. सुप्रिया सुळे
या पत्रासंदर्भात विचारले असता खासदार सुप्रिया सुळे यांनी, असे कोणतेही पत्र अद्याप माझ्यापर्यंत आलेले नाही, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, लेखक प्रमोद मुनघाटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, सर्व लेखक वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याने पत्रावर सर्वांच्या सह्या घेणे शक्य झाले नाही; मात्र निर्णय सर्वानुमते घेतलेला असून तो ठाम आहे.

COMMENTS