मुंबई: अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) मुंबईत राबवलेल्या विशेष कारवाईत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरण
मुंबई: अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) मुंबईत राबवलेल्या विशेष कारवाईत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी 14 गुन्ह्यांमध्ये 21 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एएनसीने केलेल्या तीन कारवायांमध्ये 25 लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याशिवाय ई-सिगारेटच्या गोदामावर कारवाई करण्यात आली असून त्यात ई-सिगरेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ट्रॉम्बे चिताकॅम्प परिसरात ई-सिगारेटचे गोदाम असून तेथे ई सिगारेटची विक्री, लिक्वीड फ्लेवर्सचा वापर करून ई सिगारेट पुन्हा रिफील करण्यात येतात. तसेच त्यांची बॅटरी पुन्हा रिअसेंबल करण्यात येत असल्याची माहिती एएनसीच्या आझाद मैदान कक्षाला मिळाली होती. या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या गोदामातून 301 ई-सिगारेट, वापरून रिकाम्या झालेल्या 402 ई-सिगारेट, 130 ई-सिगारेटच्या बॅटर्या व फिल्टर्स, 303 ई सिगारेट फ्लेवर्स बाटल्या, ई-सिगारेटच्या बॅटरीचे 9 चार्जर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 कलम 7 व 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा परिसरात करण्यात आलेल्या अन्य कारवाईमध्ये दोघांना अटक करण्यात आली. आरोपीकडून 77 ग्रॅम वजनाचे ‘एम. डी’(मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 15 लाख 40 हजार रुपये आहे. याप्रकरणी कांदिवली कक्षात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसर्या कारवाईत वरळी कक्षाने माझगाव येथून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून 46 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. मागील 15 दिवसांत अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने विशेष मोहिमेदरम्यान यशस्वीरित्या एकूण 14 गुन्हे नोंद केले असून एकूण 21 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 849 ग्रॅम एम. डी., 1 किलो 230 ग्रॅम चरस, 92.4 ग्रॅम हेरॉईन, 280 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा सुमारे दोन कोटी 60 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबईसह अन्य ठिकाणच्या पोलिस ठाण्यांनी केलेल्या कारवाईत अंमलीपदार्थांसह 17 आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय बेकायदेशिररित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी कोप्टा कायद्याअंतर्गत 407 कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच 66 अनधिकृत टपर्यांचे निष्कासन करण्यात आले आहे.
COMMENTS