डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत महिलांसाठी आरोग्य,आहार आणि योग कार्यशाळा संपन्न

Homeताज्या बातम्याअहमदनगर

डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत महिलांसाठी आरोग्य,आहार आणि योग कार्यशाळा संपन्न

योगा,आहार आणि नैसर्गिक जीवनशैली ही सशक्त आरोग्याची गुरुकिल्ली-डॉ.हेमा सेलोत 

नगर - डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात  महिला व विद्यार्थिनींसाठी योगा, आहार व आरोग्य या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन

डॉ. विशाखा सोनवणे एम.डी.एस. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
हवेतील ऑक्सिजन मिळवण्याचे प्रयत्न सुरू : रोहित पवार
पाथर्डीतील घुमटवाडी येथे चक्क पाण्याची चोरी

नगर –

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात  महिला व विद्यार्थिनींसाठी योगा, आहार व आरोग्य या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ.हेमा सेलोत, झुंबा व योगा तज्ज्ञ सौ.सुरुची धोंडे तसेच आरोग्यवर्धिनी विद्यार्थिनी दिक्षीका कराचीवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये महिला सशक्तीकरण व सबलीकरण यावर आधारित योगा व झुंबा प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर प्रमुख वक्त्या डॉ.हेमा सेलोत यांनी ‘आधुनिक काळातील महिलांचे आरोग्य व आहार’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

डॉ.सेलोत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे पाहण्याचा वेळच उरत नाही. परंतु घर, नोकरी, जबाबदार्‍या सांभाळताना महिलांनी आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सक्षम ठेवणे अत्यावश्यक आहे. महिलांमध्ये थायरॉइड, हॉर्मोनल असंतुलन, अ‍ॅनिमिया, हाडांच्या तक्रारी यासारख्या समस्या वाढत आहेत, याचे मूळ कारण चुकीची जीवनशैली व असंतुलित आहार आहे. दररोजच्या आहारात हिरव्या भाज्या, मोड आलेले कडधान्य, फळे, भरपूर पाणी आणि योग्य वेळेवर झोप याचा समावेश करून शरीरातील नैसर्गिक संतुलन राखता येते.

तसेच पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, योगा आणि ध्यान ही आपल्या संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. यामध्ये केवळ शरीर नव्हे तर मन, भावना आणि ऊर्जा या सर्वांचे शुद्धीकरण होते. दिवसाची सुरुवात 15 मिनिटे प्राणायाम व सूर्यनमस्काराने केल्यास मानसिक शांती व ऊर्जा टिकून राहते. महिलांनी स्वतःला ‘प्राथमिकता’ देण्याची सवय लावली पाहिजे. ‘मी आनंदी तर माझे कुटुंबही आनंदी’ ही भावना ठेवून शरीराची नियमित निगा राखणे, हे आत्मभान जागृत करण्याचे पहिले पाऊल आहे.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ. सत्यवती मगर यांनी केले होते, तर सूत्रसंचालन प्रा. प्रियांका जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक श्री.सुनील कल्हापुरे व प्राचार्य डॉ.रवींद्र नवथर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन  तथा पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील आणि डायरेक्टर जनरल (प्रशासन) डॉ.पी.एम. गायकवाड यांनी आयोजकांचे व सहभागींचे विशेष कौतुक केले.  

COMMENTS