Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शेखर पाटील यांच्या पुस्तकाला ‘मसाप’चा पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक लेखनाबद्दलचा रा. ना. नातू स्मृती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेले अण्णा हजारेंच्या भेटीला…
कोल्हार येथे आगीत दुकान जळून भस्मसात
धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक लेखनाबद्दलचा रा. ना. नातू स्मृती पुरस्कार यावर्षी साहित्यिक तथा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या शूर सेनापती संताजी : प्रतिशोध शंभूराजांच्या क्रूर हत्येचा’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार व कार्यवाह उद्धव कानडे यांनी ही घोषणा केली. पुरस्कार वितरण 26 मे रोजी पुण्यात होणार आहे.
डॉ. शेखर पाटील यांनी लिहिलेल्या ‘शूर सरसेनापती संताजी : प्रतिशोध शंभूराजांच्या क्रूर हत्येचा’ या पुस्तकाचे गेल्यावर्षी अहमदनगरमध्ये प्रकाशन झाले. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. डॉ. शेखर पाटील यांनी उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात कार्यरत असताना विविध विषयांवरील पुस्तके लिहिली आहेत. त्यातीलच शूर सेनापती संताजी हे इतिहास संशोधनपर पुस्तक ठरते. साडेपाच वर्षे सातत्य व जिद्द ठेवून सुमारे आठ हजार किलोमीटर प्रवास करून जेथे मुघलांच्याविरुद्ध लढाया झाल्या तेथे प्रत्यक्ष भेटी दिल्या. परिस्थितीचे आकलन करून ही उत्कृष्ट कलाकृती त्यांनी साकारली आहे. त्यांच्या सुलभ लेखणीतून आणि मेहनतीतून साकारलेल्या या पुस्तकाला रसिकांची दाद मिळाली आहे. इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे रहावेत, अशा पद्धतीने ते मांडले आहेत. त्यातील संवादांमुळे प्रंसग जिवंत करण्याची कलाही या पुस्तकात पहायला मिळते. इतिहास संशोधकांसह अनेक साहित्यिकांनीही या पुस्तकाचे कौतूक केले आहे. ऐतिहासिक संदर्भांचे आकलन, भौगोलिक मापदंडातून केलेले ऐतिहासिक संशोधन, हुबेहूब प्रसंग उभे करण्याचे कौशल्य, जणू आपण त्या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत असा भास निर्माण करण्याची हातोटी, निसर्गाचे केलेले सुंदर वर्णन, प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला दिलेला न्याय, समतोल लेखनातील प्रभुत्व, मराठी भाषेची सुरेख मांडणी, उत्कृष्ट मुखपृष्ठरचना व प्रसंग जिवंत करणारी रेखाचित्रे हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे.
डॉ. शेखर पाटील यांची दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पोलिस दलातील कामगिरीवर आधारित पुस्तकांसोबतच प्रेमकथा संग्रहही त्यांनी लिहिला आहे. त्यांना यापूर्वीही अनेक साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. आता महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक लेखनाचा रा. ना. नातू स्मृती पुरस्कार 2022 डॉ. शेखर पाटील यांच्या शूर सेनापती संताजी या पुस्तकाला जाहीर केला आहे. याबद्दल मसापच्या सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर यांच्यासह नगरमधील साहित्यिकांनी डॉ. शेखर पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS