मुंबई ः मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर उसळला असतांना, इंदू मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेले डॉ
मुंबई ः मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर उसळला असतांना, इंदू मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक कधीपर्यंत पूर्ण होईल, असा सवाल आंबेडकरी अनुयायांकडून विचारला जात आहे. मात्र या स्मारकाचे आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे स्मारक मे 2026 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या स्मारकाचे काम रखडले आहे. मात्र आता हे स्मारक कधी पूर्ण होणार, याबाबत नवी माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत असलेल्या या स्मारकाचे आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. दादरमधील इंदू मिलमधील 4.84 हेक्टर जागेवर राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकाची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूमीपूजनानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. काही कारणांमुळे कंत्राटदारास कार्यादेश देण्यास विलंब झाला. परिणामी, स्मारकाचे काम सुरू होण्यासही विलंब झाला. या स्मारकाचे काम 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. एमएमआरडीएने आता स्मारकाच्या कामाला वेग दिला. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. या स्मारकाचे आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी दिली. स्मारकातील बांधकाम 52 टक्के, वाहनतळाचे 95 टक्के, प्रवेशद्वाराचे 80 टक्के, सभागृहाचे 70 टक्के, ग्रंथालयाचे 75 टक्के, प्रेक्षागृहाचे 55 टक्के, स्मारक इमारतीचे 45 टक्के असे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान 1089.95 कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम 2024 मध्ये पूर्ण होईल, असेही या अधिकार्यांनी सांगितले. मात्र पुतळ्याच्या कामास आता सुरूवात झाली असून ते पूर्ण होण्यास काहीसा काळ लागणार आहे. त्यामुळे हे स्मारक आता मे 2026 मध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
COMMENTS