मुंबई : दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय
मुंबई : दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मराठी पाटी नसलेल्या व्यावसायिकांना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल. मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणार्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी आढावा बैठकीनंतर दिले.
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, दुकाने व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत ठळक अक्षरात लावण्यासाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपुष्टात आली. त्यानंतर, 28 नोव्हेंबर 2023 पासून महापालिकेने तपासणी सुरु केली. 31 मार्चपर्यंत 87,047 पैकी 84,007 दुकाने व आस्थापनांनी (96.50 टक्के) मराठीत नामफलक लावल्याचे आढळून आले आहे. उर्वरित 3,040 आस्थापनांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. मराठी पाट्यांसंदर्भात न्यायालयात एकूण 1,928 प्रकरणे दाखल झाली असून 177 व्यावसासियांना 13 लाख 94 हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. 1,751 प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. महापालिका प्रशासनाकडे सुनावणीसाठी आलेल्या 916 पैकी 343 प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यातून 31 लाख 86 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. उर्वरित 573 प्रकरणांच्या सुनावणीची प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. मराठीत नामफलक नसेल, तर प्रकाशित फलकासाठी (ग्लो साईन बोर्ड) दिलेला परवानाही तत्काळ रद्द करण्यात येणार आहे. हा परवाना रद्द झाल्यास नव्याने परवाना मिळविणे, फलक तयार करणे यासाठी संबंधित आस्थापनाधारकांना 25 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
COMMENTS