नांदेड प्रतिनिधी - महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वच जण अतूर झा

नांदेड प्रतिनिधी – महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वच जण अतूर झाले आहेत. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने वेळ प्रसंगी पायी चालत सावळ्या विठ्ठलाची मनमोहक मूर्ती डोळ्यात साठविण्यासाठी विठ्ठल भक्त पंढरपूरकडे कूच करत आहेत.
कोणत्याही देशात न होणारा असा भव्य आषाढी सोहळा साजरा करण्यासाठी मग महाराष्ट्राची लालपरी तरी मागे कशी राहणार? पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नांदेड जिल्ह्यातील नऊ आगारांतून 250 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. तब्बल महिनाभर आधीपासून भाविक राज्याच्या कान्याकोपर्यातून पायी वारी करत पंढरपूरला जात असतात. दरवर्षी हा सोहळा नयनरम्य ठरत असतो. लाखो वारकरी हातात भागवत धर्माची पताका घेऊन दिंडीत सहभागी होतात. राज्यभरातून हजारो दिंड्याद्वारे लाखो वारकरी पायी वारीत सहभागी असतात. दरवर्षी छोट्या मोठ्या अशा अनेक दिंड्या नांदेड जिल्ह्यातूनही पंढरपूरकडे जात असतात. नांदेड जिल्ह्यातही वारकर्यांची संख्या लक्षणीय आहे. महिन्याची वारी करणारेही अनेक जण असतात. मात्र, आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपूरकडे जाणारे शेकडो भाविक नांदेड जिल्ह्यातील असतात. या सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातर्फे दरवर्षी विशेष बसची व्यवस्था करण्यात येते. कोरोना संसर्गाच्या काळात मागील दोन वर्षे ही बससेवा बंद होती. परंतु, गेल्या वर्षापासून परत मोठ्या उत्साहात आषाढी यात्रेची बससेवा महामंडळाने सुरु केली आहे. यंदाही ही बससेवा येत्या ता. 25 जूनपासून सुरु होणार आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यातील तब्बल 250 बस पंढरपूरसाठी विशेष म्हणून सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात नऊ आगार असून या नऊ आगारांतून ता. 25 जून ते ता. चार जुलै या कालावधीत 250 बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आगारनिहाय बसचे नियोजन पंढरपूरकडे जाणार्या भाविकांसाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात येतात. यंदाही ता. 25 जून ते ता. चार जुलै या दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी बस सोडण्यात येणार आहेत. आगार परिसरातील गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी 40 ते 45 प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाल्यास त्या गावातून थेट जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी आगार प्रमुख आणि बसस्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क करावा. पंढरपूर येथेही नांदेड जिल्ह्यातील आगाराच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
COMMENTS