सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणीपुणे ः पुणे भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिवंगत उपमुख्

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी
पुणे ः पुणे भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असताना, त्याच वेळी पुणे भूखंड प्रकरणातील चौकशी थांबवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे.
अंजली दमानिया यांनी रविवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट भूमिका मांडत म्हटले की, जर निधनानंतर तीन दिवसांत शपथविधी घेणे योग्य मानले जात असेल आणि ‘बिझनेस अॅज यूज्युअल’ असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही सुरूच राहिली पाहिजे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्याविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करण्यात यावी, तसेच खारगे आयोगाचा अहवाल विलंब न लावता सार्वजनिक करण्यात यावा, अशीही त्यांनी मागणी केली. चौकशी सुरू असताना पार्थ पवार यांना राज्यसभेचे खासदार बनवण्याची चर्चा चुकीची असून, अशा प्रकारचा निर्णय नैतिकतेच्या कसोटीवर टिकणारा नाही, असे दमानिया यांनी ठामपणे नमूद केले. याच मुद्द्याकडे लक्ष वेधत अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आणला असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याचा सिद्धांत प्रत्यक्षात उतरवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या वक्तव्यांमुळे पुणे भूखंड प्रकरण पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
चौकट———-
‘संधीसाधू’ नेत्यांवरही टीका
या प्रकरणात अंजली दमानिया यांनी काही नेत्यांच्या भूमिकेवरही टीका केली आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर काही ‘संधीसाधू’ नेते त्यांच्या भोवती वावरताना दिसत असल्याचा आरोप करत त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले. पुन्हा सत्तेत येण्याची तडफड स्पष्टपणे दिसते, असे सूचक विधान त्यांनी केले. उल्लेखनीय म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, तर या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटकही झाली आहे.
चौकट———
पुणे भूखंड घोटाळ्याचा आरोप काय?
पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 1,800 कोटी रुपये किमतीचा भूखंड केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप आहे. ही खरेदी पार्थ पवार यांच्याशी संबंधित ‘अमेडिया’ या कंपनीमार्फत झाल्याचे सांगितले जाते. या व्यवहाराशी संबंधित प्रकरणात शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाले असले, तरी अद्याप पार्थ पवार यांच्यावर कोणतीही थेट कारवाई झालेली नाही.

COMMENTS