कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील करंजी बु.येथील रयतलक्ष्मी पतसंस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक वर्तमानातील महाराष्ट्र ऊद्योगरत्न पुरस्काराचे मानकरी आयु
कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील करंजी बु.येथील रयतलक्ष्मी पतसंस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक वर्तमानातील महाराष्ट्र ऊद्योगरत्न पुरस्काराचे मानकरी आयुब बनेमिया शेख यांनी त्यांच्या कारकीर्दीत म्हणजेच सन 2019-21 च्या कालखंडात जवळपास 84 लक्ष रुपयांचे बोगस कर्ज घेऊन गैरव्यवहार केला. याबाबद कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे साहजिकच गैरव्यवहार करा आणि उद्योगरत्न बना याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. सध्या पुरस्कारांची दुकानदारी वाढली असून त्याचे भांडवल करुन जनतेला पुरस्कार्थी भुरळ पाडत आहे.
रयतलक्ष्मीत 84 लाख रुपयांचे बोगस कर्ज घेऊन संस्था लुटणार्या या व्यवस्थापकाने करंजी गावात चौरंगीनाथ अॅग्रो प्रोडूसर कंपनी, खाजगी बाजार समिती सुरु केली असून तिचा अध्यक्ष आहे. गैरव्यवहाराचा ठपका मार्च 2023 मध्येच अप्पर लेखापरीक्षक आनिष पटेल यांनी ठेवला असुनही प्रशासकीय पातळीवर वेळ काढूपणाने शेखला बारा महिने अभय देण्यात आल्याचे आता सिद्ध झाले आहे. गैरव्यवहाराचा ठपका असतानाही खाजगी बाजार समितीची परवानगी मिळवणे, जागेच्या भाडेपट्ट्याची कालमर्यादा आणि क्षेत्र, खाजगी बाजार समितीची परवानगी देताना विचारात न घेतलेल्या शेतकर्यांसाठीच्या सुविधांची वानवा तसेच निधी बँक सुरु करुन काही महिन्यांत बँक बंद करून क्रेडीट सोसायटीची स्थापना असे अनेक गुंतागुंतीचे व्यवहार करुन रयतलक्ष्मी गैरव्यवहारात आयुब शेखवर तब्बल बारा महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्याने चौरंगीनाथ अॅग्रो प्रोडूसर कंपनी नावाने सुरु केलेल्या खाजगी बाजार समितीत शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे पैसे मिळतील का? असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. चौरंगीनाथ उद्योग समूहाचा गैरव्यवहारातून उभा केलेला डोलारा बघुन चौरंगीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आयुब बनेमिया शेख यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे.
करंजी गावात गेल्या चार वर्षांपूर्वी चौरंगीनाथ अग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना करुन त्यासोबतच त्यांनी शेतकर्यांचा महत्त्वाचा जोडधंदा असलेले दूध खरेदी संकलन केंद्र, शेती उपयोगी औषधे बी-बियाण्यांचे दुकान, शेतकर्यांचे धान्य सफाई करिता अत्याधुनिक मशीन खरेदी केले आहे. आर्थिक व्यवहाराच्या उद्देशाने अग्रो लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापनाही केलेली आहे. बोगस कर्ज रकमेतून संस्था आणि व्यवसायाचे जाळे निर्माण केले. त्या संस्थांंशी संबंधित वरीष्ठांना रयतलक्ष्मीने गैरव्यवहार निदर्शनास आणुन देऊनही तो नजरेआड करुन प्रशासकीय पातळीवर त्याला बळ देण्यासाठी अनेकांचा वरदहस्त असल्याचे निष्पन्न होत आहे. त्या सर्वांचा प्रशासनाने शोध घेण्याची गरज आहे.
बारा महिन्यापुर्वीच प्रशासकीय पातळीवर आरोप निश्चितीचा अभिप्राय प्राप्त झाल्याची चर्चा परिसरात असुनही हा गैरव्यवहार झाकण्यासाठी की काय शनिवार दि 13 जानेवारी रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सिने अभिनेता अंकुश चौधरी यांच्या सह मान्यवरांच्या शुभहस्ते स्विफ्ट अँड एन लिफ्ट मीडिया ग्रुप या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह व 25 हजार रुपये रोख देऊन शेखला महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यामुळे या गैरव्यवहारावर पांघरुण घालण्यासाठी पुरस्कार मिळाला की अर्थपुर्ण तडजोडीअंती पुरस्कार देऊन नाणे उजळून घेतले. याचे संशोधन व्हायला हवे. नाही तर हाच आदर्श भ्रष्टाचारींच्या मनात रुजविल्या जाऊन प्रत्येकजण म्हणेल गैरव्यवहार करा आणि महाराष्ट्र उद्योगरत्न बना.
चौकट
पुरस्काराची चौकशी होईल का?
पुण्याची स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया ग्रुपने 13 जानेवारी2024 फोर पाईंट हॉटेल खराडी पुणे येथे राज्यभरात एकुण
79 जणांना पुरस्कार दिले, त्यात 15 नंबरवर नामांकन असलेले आयुब शेख यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेने उद्योजकांची कदाचित चारित्र्य पडताळणी केली नसावी किंवा पुरस्कार देताना काही अर्थपूर्ण तडजोडीतून गैरव्यवहारातील उद्योजकरत्न शोधले की काय, याबाबत शंका उपस्थित होत असून या पुरस्कारांची चौकशी व्हायला हवी.
COMMENTS