Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार महिलांमध्ये अस्वस्थता…धूमस्टाईल दागिने ओरबाडले

एकाच दिवशी नगरमध्ये घडल्या चार घटना, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

अहमदनगर/प्रतिनिधी ः मागचा रविवारचा दिवस शहरातील चार महिला व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता पसरवणारा ठरला. चार विविध ठिकाणी चार महिलांच्या गळ

बेलापूरात सापडले गुप्तधन |माझं गाव माझी बातमी|LokNews24 |
आव्हाड महाविद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात
सेवाभावी पुरस्कार आणि ग्रंथप्रकाशनच खरे पुण्यस्मरण ः काका कोयटे

अहमदनगर/प्रतिनिधी ः मागचा रविवारचा दिवस शहरातील चार महिला व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता पसरवणारा ठरला. चार विविध ठिकाणी चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूमस्टाईलने ओरबाडण्यात आले. या वाढत्या घटनांंमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. रविवारी सकाळी व सायंकाळी सावेडी उपनगरात तीन तर नालेगाव परिसरात एक घटना घडली. यासंदर्भात तोफखाना आणि कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

रविवारी सकाळी शोभा सुधाकर कल्हापुरे (वय 50, रा. शिवनगर, जुना पिंपळगाव रोड, सावेडी) व त्यांचा मुलगा दुचाकीवरून सावेडीच्या पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौकाकडून तपोवन रोडकडे जात असताना साहीब बेकरीसमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने शोभा यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण ओरबाडून धूम ठोकली. मानेला हिसका बसताच कल्हापुरे यांनी आरडाओरडा केला. परंतु घटनास्थळी नागरिक जमा होण्याअगोदरच चोरटे पसार झाले. यासंदर्भात कल्हापुरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पुष्पावती पंडीतराव ठमके (वय 59, रा. सोनानगर, सावेडी) या त्यांच्या नातवाला घेऊन सोनानगर पार्कपासून पाटील चौकाकडे जात असताना साबळे यांच्या घराजवळ त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण ओरबाडले. पुष्पावती यांचा नातू सायकलसह रस्त्यावर पडल्याने पुष्पावती त्याला उचलण्यासाठी खाली वाकल्या असता चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण ओरबाडून पायी पळत सुटला. पुष्पावती यांनी आरडाओरडा केला, परंतु चोरटा पसार झाला. यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दोघींनी केला प्रतिकार– धुमस्टाईलने दागिने ओरबाडणार्‍यांचा दोन महिलांनी प्रतिकार केला. मात्र, दागिने वाचवण्यात त्यांना अपयश आले. पहिल्या घटनेत रविवारी सायंकाळी 7.25 वाजण्याच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यानजवळ वनिता सुभाष जोशी यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन ओरबडली. यावेळी वनिता जोशी यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता चोरट्याने सोन्याच्या चेनचा आर्धा भाग तोडून पळ काढला. त्यानंतर दुसरी घटना नालेगावातील कुंभार गल्लीत घडली. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नालेगाव परिसरातील कुंभारगल्लीमध्ये असलेल्या ईशान अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. यासंदर्भात संपदा संजय साठे (वय 42, रा. कुंभारगल्ली, नालेगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे व त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या त्यांच्या मैत्रीण सुनीता बाळासाहेब खिलारी या बाजारात गेल्या होत्या. त्या रात्री नऊ वाजता घरी आल्या. त्यांनी त्यांची दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली व पायर्‍या चढून फ्लॅटमध्ये जात असताना एक अनोळखी व्यक्ती तेथे आला. त्याने येथे त्रिवेदी राहतात काय, अशी विचारणा केली. सुनीता यांनी त्याला येथे त्रिवेदी राहात नसल्याचे सांगितले. तेवढ्यात त्याने सुनीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केला असता त्याने त्यांना खाली ढकलून दिले व संपदा यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून खाली धूम ठोकली. तो चोरटा दुचाकीवर त्याच्या साथीदारासह पळून गेला.

महिलांमध्ये पसरली दहशत – एकाच दिवशी दागिने ओरबाडण्याच्या चार घटना घडल्याने महिलांमध्ये पुन्हा मंगळसूत्र चोरणार्‍या चोरट्यांची दहशत पसरली आहे. शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटनाही थांबायला तयार नाही. या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. पोलिस ठाण्यांतील गुन्हे शोध पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही हे चोरटे सापडत नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे व गुन्हेगारांना पकडण्याचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हेगारी घटना मात्र वाढतच आहे.

COMMENTS