अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतून ज्ञानदानाचे कार्य करणार्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवड
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतून ज्ञानदानाचे कार्य करणार्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन धुळीस मिळाले आहे. शिक्षकांच्या इब्टा संघटनेने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. पण अन्य मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने हा बिनविरोधचा फुगा अखेर फुटला व बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 719 अर्जांची विक्री झाली व पाच उमेदवारी अर्जही दाखल झाले आहेत. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 24 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.17) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बँकेच्या 21 जागा असून यात प्रत्येक तालुक्यातून एक अशा 14 जागा, मनपा-नपा-नॉन टिचींग मतदारसंघातून 2, महिला प्रतिनिधी 2 आणि अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती-जमाती या मतदारसंघातून प्रत्येकी 1 अशा 21 जागा आहेत व साडेदहा हजारावर शिक्षक मतदार आहेत. या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली.
अर्जांसाठी उडाली झुंबड
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेणे आणि अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शिक्षकांची अर्ज घेण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे विक्रमी उमेदवारी अर्जाची विक्री झाली. पहिल्याच दिवशी बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणार्या मंडळ आणि संघटनांनी तब्बल 719 उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. तर पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखलही झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक गणेश गिरी यांनी दिली. पहिल्याच दिवशी सकाळपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शिक्षक संघटना आणि मंडळांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज विकत नेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी शिक्षक परिषद आणि गुरूमाऊली मंडळ रावसाहेब रोहकले गटाने 130 अर्ज विकत नेले. तर त्यांच्या गटाच्यावतीने संजय शिंदे यांनी नॉन टिचिंग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह याच मतदारसंघातून शहा अल्ताफ रसूल आणि अमोल गोरक्षनाथ लांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर गुरूमाऊली बापूसाहेब तांबे गटाच्यावतीने स्वत: तांबे यांनी 21 अर्ज, त्यांचे सहकारी संदीप मोटे यांनी 50 आणि राजू राऊत यांनी 50 अर्ज विकत नेले. तांबे गटाच्यावतीने 121 उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. त्यांच्या गटाचे संदीप मोटे यांनी श्रीगोंदा सर्वसाधारण मतदारसंघातून स्वत:चे दोन उमदेवारी अर्ज दाखल केलेले आहेत. याच दरम्यान डॉ. संजय कळमकर यांच्या गुरूकुल मंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे यांनी 121 उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. स्वराज शिक्षक संघटनेच्यावतीने सचिन नाबदे यांनी 60 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर सर्वात जुने मंडळ असणार्या सदिच्छा मंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी 120 उमदेवारी अर्ज विकत नेलेले आहेत. यासह काही इच्छुकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज नेले आहेत. शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी उमेदवारी अर्जाची विक्री झाल्याने निवडणुकीत रंगतदार होणार याचा अंदाज दिसू लागला आहे. एकीकडे शाळा व नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झाले असून दुसरीकडे शिक्षक बँकेचे तालुक्या-तालुक्यात राजकारण रंगणार आहे. उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी व उमदेवारी अर्ज नेण्यासाठी गुरुवार (दि.23) पर्यंत मुदत असल्याने यंदा विक्रमी उमदेवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
72 हजाराची झाली कमाई
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची किंमत 100 रुपये आहे. पहिल्या दिवशी 719 अर्जाची विक्री झाली असून यामुळे 71 हजार 900 रुपये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा झाले आहेत. उमेदवारी अर्जाच्या विक्रीवरून बँकेच्या निवडणुकीत किती कोटींचा चुराडा होणार याचा अंदाज आताच दिसू लागला आहे.
उमेदवारीसमवेत माघारी अर्जही
शिक्षक नेत्यांनी स्वत: अथवा त्यांच्या विश्वासू व्यक्ती यांच्यामार्फत उमदेवारी अर्ज विकत नेले आहे. उमेदवारी अर्ज बँकेचा कोणताही सभासद विकत नेवू शकतो आणि सभासद शिक्षकांना सूचक आणि अनुमोदक देवून अर्ज दाखल करू शकतो. मात्र, सर्व मंडळात वाढलेली इच्छुकांची संख्या पाहता सर्व मंडळाचे नेते ज्यांचे उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यांच्या माघारीचा अर्जही आधीच त्यांच्याकडून भरून घेणार आहेत. यातून ऐनवळी माघारीसाठी अडचण येणार नसल्याने नेत्यांचा हा मुत्सद्दीपणाही चर्चेत आहे.
COMMENTS