जिल्हा व नगर शिवसेनेची गोची…कोणाचा झेंडा घेऊ हाती?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा व नगर शिवसेनेची गोची…कोणाचा झेंडा घेऊ हाती?

अहमदनगर/प्रतिनिधी : एकीकडे आराध्य दैवत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व दुसरीकडे नगरला शिवसेनेचे तीन महाप

हुतात्मा स्मारकाविषयी भाजप-मनसेचे उपोषण स्थगित  
सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात
भंडारदरा धरणाच्या सुरक्षा भिंतेवर दारु पिणार्‍यांचा उच्छाद

अहमदनगर/प्रतिनिधी : एकीकडे आराध्य दैवत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व दुसरीकडे नगरला शिवसेनेचे तीन महापौर करणारे व नगर विकास खात्याच्या माध्यमातून मनपातील शिवसेनेच्या विद्यमान महापौर रोहिणी शेंडगे यांना कोट्यवधीचा विकास निधी देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे…या दोघांपैकी कोणाची बाजू घ्यावी, या संभ्रमात जिल्हा व नगर शहर शिवसेना आहे. या दोन्ही नेत्यांचा झेंडा भगवा असला तरी यापैकी कोणाचा झेंडा हाती घेऊ, अशी गोची जिल्ह्यात शिवसेनेची झाली आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठबळावर राज्यातील सत्तेत असलेली शिवसेना राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 36च्यावर आमदारांना व काही अपक्ष आमदारांना आपल्या समवेत घेऊन शिवसेना-बाळासाहेब असा नवा पक्ष काढण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही सामान्य शिवसैनिकांना साद घालून त्यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे. ठाकरे व शिंदे हे दोन्हीही नेते शिवसेनेचा कणा असल्याने तसेच संघटना व मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरेंचे तर मंत्रीपदाच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी व राजकीय पदे देत एकनाथ शिंदेंचेही नगर शहर शिवसेनेवर उपकार असल्याने या दोन्ही नेत्यांच्या भांडणात जिल्हा व शहर शिवसेनेची गोची झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी मातोश्रीहून येणार्‍या आदेशाचे पालन शहरातील शिवसेना करेल, असे जाहीर केले असले तरी शिवसेनेचेच स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याने या दोन घटनांतून शहर शिवसेनेत फुटीची चिन्हे दिसू लागली आहेत. काहींनी ठाकरेंच्या मागे जाण्याचे ठरवले असले तरी काहीजण शिंदेंना नवा नेता मानण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

दोघांचेही नगरवर उपकार
नगर शहरातील शिवसेना दिवंगत माजी आमदार अनिलभय्या राठोड यांना मानणारी आहे. कट्टर व निष्ठावान म्हणून गणल्या गेलेल्या आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा सैनिक मानल्या गेलेल्या अनिलभय्या राठोड यांच्याविषयी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विशेष ममत्व व अभिमान होता. चार वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीनंतर केडगावच्या दोन शिवसैनिकांच्या निर्घृण हत्या झाल्या. त्यामुळे शहर शिवसेनेसह जिल्हा शिवसेनेत अस्वस्थता होती. अशा वेळी खुद्द उद्धव ठाकरे यांनी नगरला येऊन येथील शिवसैनिकांना धीर दिला. हत्याकांडात बळी पडलेल्या दोन्ही शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना राज्यभरातील शिवसेनेच्या माध्यमातून आर्थिक मदतही केली. तर दुसरीकडे मागील युती सरकारच्या व आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नगरच्या मनपाला कोट्यवधीचा भरीव निधी देण्यात एकनाथ शिंदे यांनी कधी हात आखडता घेतला नाही. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नगरला शिवसेनेच्या शीला शिंदे, सुरेखा कदम व आताच्या रोहिणीताई शेंडगे या तिन्ही महिलांना महापौर करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यातील 2010मधील शीला शिंदे व 2016मधील सुरेखा कदम ही दोन्ही महापौरपदे मिळवणे म्हणजे राजकीय कौशल्य तसेच साम-दाम-दंड-भेद या नीतीचा कळस गाठला गेल्याची स्थिती नगरमध्ये होती. 2016मध्ये तर त्यावेळचा मित्रपक्ष भाजपनेही विरोधात शड्डू ठोकले होते. पण या राजकीय खेळ्यांना पुरून उरत व स्वतःची सर्वप्रकारची ताकद दाखवत एकनाथ शिंदेंनी ही दोन्ही महापौरपदे शिवसेनेच्या महिलांना मिळवून दिली. आताही वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीशी समन्वय साधून फारसे राजकीय आकांडतांडव न होता रोहिणीताई शेंडगे यांना महापौर करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे ठाकरे व शिंदे यांचे नगर शहर व जिल्हा शिवसेनेवर अनंत उपकार असल्याने आता त्या दोघात सुरू असलेल्या राजकीय युद्धात या दोघांपैकी कोणाची बाजू घ्यावी, याचा संभ्रम सध्या शहर व जिल्हा शिवसेनेत आहे. मात्र, ठाकरे व शिंदे यांचे राजकीय युद्ध जसजसे पुढे सरकेल व त्यात जसे ट्वीस्ट येतील, तशी शहर व जिल्हा शिवसेनेची भूमिकाही बदण्याची शक्यता आहे. सध्या तरी दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व शहर प्रमुख संभाजी कदम यांनी ठाकरेंना समर्थन जाहीर केले आहे. तसेच उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनीही ठाकरेंच्या समर्थनार्थ फ्लेक्स झळकावत…काळ कसोटीचा आहे, पण संघर्ष आम्हाला नवीन नाही…आता पुन्हा लढायचंय…असे स्पष्ट करीत ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. पण भविष्यात या नेतेमंडळींची हीच भूमिका कायम राहील की नाही, याचा संभ्रम शिवसैनिकात मात्र जोरदार चर्चेत आहे.

शिंदेंनी बाजी मारली तर…
राज्यातील ठाकरे व शिंदे यांच्यातील राजकीय युद्धात शिंदेंनी बाजी मारली तर आता ठाकरेंना समर्थन देणारांची स्थिती काय होईल, याची जोरदार चर्चा शहर शिवसेनेत आहे. स्व. अनिलभय्या राठोड यांच्या निधनानंतर शहर शिवसेनेला कोणीही वाली राहिलेला नाही. सारेच नेते झाले आहेत व त्यांच्यातही सुप्त संघर्ष आहे. जिल्ह्यातही शिवसेनेचा कोणी आमदार नाही. सोनईचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी नगर शहर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची त्यांची तयारी नाही. त्यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत राहण्याचे स्पष्ट केले असले तरी भविष्यात राज्यातील राजकीय स्थिती बदलली व शिंदेंचे पारडे जड झाले तर काय, असा प्रश्‍न सर्वांसमोरच ठाकल्याने शहर व जिल्हा शिवसेनेची गोची झाली आहे. शिवसेनेचे अनेक नगरसेवक शिंदे यांना मानणारे आहेत. मात्र त्यांच्या सध्याच्या भूमिकेवर त्या सर्वांनीच चुप्पी साधली आहे. शिंदे यांनी बंडाची भूमिका घेतली असली तरी पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अशीच अनेक नगरसेवकांची भूमिका आहे. त्यामुळे अनेकांनी वेट अ‍ॅँड वॉच ही भूमिका ठेवल्याचे दिसू लागले आहे.

COMMENTS