सासवड : पुरंदर तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पुरंदरचे तहसिल

सासवड : पुरंदर तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, हॉटेल, ढाबे, कॅन्टीन किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा मिळावा आणि काळा बाजार रोखण्यासाठी महसूल विभाग सतर्क झाला आहे. यासाठी तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अचानक तपासणी मोहीम तहसील कार्यालयाकडून भरारी पथक तयार करण्यात आले असून हॉटेल, ढाबे व व्यावसायिक आस्थापनांवर अचानक तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान घरगुती गॅसचा वापर आढळल्यास सिलेंडर जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल. गॅस एजन्सींना कडक सूचना तहसिलदार विक्रम राजपूत यांनी सर्व गॅस एजन्सींना पारदर्शक वितरण करण्याचे आदेश दिले असून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापरासाठी पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन तहसिलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.


COMMENTS