हिंदूच्या भाषणावर ब्राह्मण महासभा रागावली का ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

हिंदूच्या भाषणावर ब्राह्मण महासभा रागावली का ?

एका हिंदू ने केलेल्या भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक का झाला, याविषयीची जिज्ञासा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आता निर्माण झाली आहे. अमोल मिटकरी

विस्तारा फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवासी महिलेचा गोंधळ
केंद्रीयमंत्री रामदास आठवले गुरुवारी नाशिक दौऱ्यावर
कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरांना ठोकल्या बेडया

एका हिंदू ने केलेल्या भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक का झाला, याविषयीची जिज्ञासा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आता निर्माण झाली आहे. अमोल मिटकरी यांनी हिंदुंच्या लग्नात जे मंत्रोच्चार केले जातात त्या मंत्राचा अर्थ समजावून सांगितला तर ब्राह्मण महासंघाला किंवा जात समूहाला नेमका राग आला? खरे तर अमोल मिटकरी ज्या सभेमधून हे सगळं सांगत होते त्या सभेत राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. ते केवळ उपस्थितीतच नव्हते तर त्यांनी अमोल मिटकरी यांच्या भाषणाला भरभरून प्रतिसादही दिला. आता तसे जर सामाजिक दृष्ट्या पण या तिघांचे जर वर्णन करायचे म्हटले तर तिघे ही हिंदू धर्माचे अनुयायी आहेत. एका बाजूला हिंदू म्हणून हिंदू जाती समूहांना एकत्रित करणे आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण समाजाने स्वतःची अस्मिता वेगळी ठेवणं, या दोन्ही गोष्टी आता सर्वसामान्य हिंदू समाजाला समजायला लागल्या आहेत, असाच याचा अर्थ घेतला पाहिजे. वास्तविक, अमोल मिटकरी यांनी जे भाषण केलेले आहे, ते भाषण हे राजकीय नाही किंवा धार्मिक स्वरूपाचेही नाही; तर, सामाजिक प्रबोधनाच्या पातळीवरील त्यांचे ते वैचारिक भाषण आहे, असे कोणताही जाणकार त्यांच्या भाषणाविषयी ठामपणे सांगू शकतो. शिवाय त्यांनी पुरोहित किंवा भटजी किंवा ब्राह्मण असा कोणताही उल्लेख आपल्या भाषणातून केलेला नाही. केवळ हिंदू समाजातील उच्चशिक्षित तरुण तरुणींचे जेव्हा लग्न होते तेव्हा त्या लग्नामध्ये ज्या मंत्राचा उच्चार होतो, त्या मंत्राचा त्यांनी सोप्या भाषेत अर्थ समजावला आहे. पुरोहित हिंदूंच्या समारंभात जे मंत्रोच्चार करतात त्याचा अर्थ जर असा उलगडून सांगितल्यानंतर ब्राह्मण समाजाचा अपमान होत असेल तर मग पिढ्यानपिढ्या हिंदूंनी त्याचा नेमका अर्थ  समजूनच घेऊ नये काय? हा प्रश्नच आहे! एका बाजूला समग्र हिंदु समाजाला धर्माच्या आधारे एकत्रित करून त्यांचा वापर इतर धर्मीयांच्या विरोधात किंवा स्वधर्मातील वेगवेगळ्या जातींच्या आपसातील विरोधात करायचा, अशी जी रणनीती आजपर्यंत पुरोहित समाजाने वापरलेली आहे, ती रणनीती या पुढच्या काळात फारशी फलदायी होऊ शकत नाही, हेच या घटनेतून ब्राह्मण समाजाने समजून घ्यायला हवे. हा प्रश्न केवळ अमोल मिटकरी यांच्या भाषणातूनच उभा राहत नाही, तर, या प्रश्नांची पार्श्वभूमी इतिहासामध्ये जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असेल, त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण असेल, अशा वेळीही पुरोहित समाजाने निर्माण केलेले प्रश्न हे इतिहासदत्त  प्रश्न म्हणून आजही उभे आहेत आणि हिंदू धर्मातील ब्राह्मणेतर जाती, हा इतिहास दिवसेंदिवस अधिक प्रकर्षाने समजावून घेत आहेत. त्यामुळे हिंदू धर्मातील बहुजन जाती समूहांना आता केवळ वापरून घेता येऊ शकत नाही, हा संदेशही या उभ्या राहिलेल्या संघर्षातून समजून घ्यायला हवा. अर्थात आजपर्यंत अशा बाबी अनुल्लेखाने मारणारा हा समाज आता एकाएकी आक्रमक प्रतिक्रिया का देऊ लागला आहे, हा देखील एक प्रश्न निर्माण होतो! कदाचित याचे कारण असे तर नाही ना की, राजकीय सत्ता आपल्या कवेत आल्यामुळे अशाप्रकारे अन्यायाचे सांस्कृतिक पुनरूज्जीवन करण्याची धडपड तर यात नाही ना? आधुनिक समाजात सर्व जाती समूहातून आता शिक्षणाचे प्रमाण वाढले असल्यामुळे पारंपारिक सांस्कृतिक जीवनातून आपल्या हक्काच्या आणि न्यायपूर्ण जीवनाचा आणि संस्कृतीचा शोध घेण्याचा प्रयत्न आता  हिंदू समूहातील सर्व जाती करू लागल्यामुळे अशा प्रकारचे संघर्षमय खटके कदाचित या पुढील काळात अधिक प्रमाणात उडू शकतात, असे संकेत तर ही घटना देत नाही ना! समाजात समता नांदावी, यासाठी सर्वांनी कटिबद्ध होणे, हाच यावर उपाय होवू शकतो!

COMMENTS