पुणे प्रतिनिधी - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण

पुणे प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाण्याचा पुनर्वापर, वाहतूक व्यवस्था आदी पायाभूत सुविधा विकसित करा. पायाभूत सुविधा विकसित करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. बदलत्या काळानुसार त्यामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे शहरातील विविध विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, वैशाली घोडेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनासारख्या विविध लोकल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्याचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. शहराचा सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरातील विकास कामे करताना नगर विकासाच्या नियमावलीप्रमाणे कामे झाली पाहिजे. कामे करताना त्रुटी कमी करुन ती दर्जेदार करण्यावर भर दिला पाहिजे. केंद्र व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
उत्तम आरोग्य सेवा देण्यावर भर – राज्य शासनाने नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेषतः अतिदक्षता विभागात अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करा. येत्या काळात शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचा विचार करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.
दर्जेदार शिक्षण देण्यावर भर द्या -विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज इमारत, स्वच्छतागृह, ई-क्लासरुम आदी पायाभूत सुविधा उभारणी भर द्यावा. मनपा प्राथमिक शाळेत ई-क्लासरुम करताना वायफाय, एचडी कॅमेरे, एलईडी डिस्प्ले आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करा. ‘आयटीआय’मध्ये रोजगार निमिर्तीच्या अनुषंगाने अभ्यासक्रम सुरु करा. नवीन शाळेची इमारत करताना त्यामध्ये मराठी माध्यमासोबत गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचाही प्रयत्न करावा.
प्रदूषणमुक्त आणि झोपडपट्टी मुक्त शहर करण्यावर भर – प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक धोरणाप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याची कार्यवाही करावी. कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यापासून वीज निमिर्ती करण्यावर भर द्या, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या भागात स्मशानभूमी आणि दफनभूमी निर्माण कराव्यात. शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. बेघर नागरिकांना पक्के घरे देण्याची कार्यवाही करा, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
पाण्याचा काटकारीने वापर करा -सद्याच्या मान्सूनच्या स्थितीचा विचार करता सर्वत्र पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. शहराला पवना, आंध्र धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळातील परिस्थितीचा विचार करुन पाण्याच्या काटकसरीने वापराचे नियोजन करावे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन करावे. रस्ते दर्जेदार, टिकाऊ पद्धतीने विकसित होतील, याकडे विशेष लक्ष द्या. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे काढावेत, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.
COMMENTS