मुंबई/पुणे ः महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारची सकाळ सुन्न करणारी आणि मनाला चटका लावणारी ठरली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय 66) यांच्या वि

मुंबई/पुणे ः महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारची सकाळ सुन्न करणारी आणि मनाला चटका लावणारी ठरली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय 66) यांच्या विमानाचा बुधवारी सकाळी लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्त विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, विमान परिचारिका पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवार पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना अडचणी निर्माण झाल्या. सुरुवातीच्या टप्प्यात धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने वैमानिकाने विमान पुन्हा उंचीवर नेले. त्या वेळी दृश्यमानता सुमारे दोन हजार मीटर इतकी असल्याची माहिती आहे. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर धावपट्टी क्रमांक 11 वर दुसरा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उतरण्याच्या प्रक्रियेदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि काही क्षणांतच कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी वैमानिकाकडून कोणताही आपत्कालीन ‘मेडे कॉल’ दिला गेला नसल्याचेही समोर आले आहे. त्या वेळेस बारामती फ्लाइंग क्लबमधून कोणतीही अन्य उड्डाणे सुरू नव्हती. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमानाचे वैमानिक व सहवैमानिक यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेता तपासाला वेग देण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, काका शरद पवार, दोन्ही मुले तसेच बहीण सुप्रिया सुळे हे बारामतीत दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उद्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने चौकशी सुरू केली आहे. तपासासाठी एक पथक दिल्लीतील विमान संचालक व्हीएसआर व्हेंचर्सच्या कार्यालयात पोहोचले असून, दुसरे पथक बारामतीत घटनास्थळी रवाना झाले आहे. दरम्यान, व्हीएसआर व्हेंचर्सने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वैमानिकाला तब्बल 16 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिकाकडे सुमारे 1,500 तासांचा अनुभव होता. विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तथापि, अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ एक अनुभवी प्रशासक नव्हे, तर राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
एएआयबी करणार सखोल चौकशी
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हिस्टीगेशन ब्युरो (एएआयबी) मार्फत अधिकृत चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी दिल्लीहून विशेष तपास पथक बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने दिली आहे. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते बॉम्बार्डियर कंपनीचे लिअरजेट-45 या श्रेणीतील होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान उतरत असताना अचानक त्याचा तोल गेला, नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर आदळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
राष्ट्रध्वज अर्ध्यावर; शासकीय कार्यक्रमांना स्थगिती
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 28 ते 30 जानेवारी या कालावधीत तीन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाकडून देण्यात आली आहे.
दुखवट्याच्या कालावधीत राज्यातील ज्या शासकीय व निमशासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या काळात कोणतेही शासकीय मनोरंजन किंवा उत्सवात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालय, लोकभवनासह राज्यातील प्रमुख प्रशासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला असून, शासनाने अधिकृतरीत्या राज्यातील दुखवटा जाहीर केला आहे.
माझा दमदार आणि दिलदार मित्र गमावला : मुख्यमंत्री
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
माझा मोठा भाऊ गेल्याची भावना ः उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचे अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी गमावला ः उद्धव ठाकरे
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला. मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
एक उमदा नेता गमावला ः राज ठाकरे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ठसवली.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आज अंत्यसंस्कार
विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवार) विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली. अजित पवारांचे पार्थिव बुधवारी दुपारी 4 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आज (दि. 29) सकाळी 9 वाजता गदीमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरूवात होणार असून, गदिमा सभागृह, विद्या प्रतिष्ठान चौक, भिगवण रोड सेवा रस्ता मराठी शाळेच्या गेटने विद्या प्रतिष्ठानच्या गेटवर जाईल. त्यानंतर 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
घड्याळातून ओळख पटली; नियतीचा क्रूर संकेत
महाराष्ट्राच्या राजकारणात धडाडीचा ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.
अपघातग्रस्त विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या परिसरात आजूबाजूला झाडझुडपे, उसाची शेती आणि विरळ वस्ती होती. अपघात इतका तीव्र होता की सर्व मृतदेह अत्यंत जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे प्राथमिक ओळख पटवणे अवघड बनले होते. मात्र, अजित पवार यांच्या मनगटावरील घड्याळामुळे त्यांची ओळख निश्चित झाली. राजकीय प्रवासात ‘घड्याळ’ हे चिन्ह अजित पवार यांच्या ओळखीचा अविभाज्य भाग राहिले. जनतेच्या मनात त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या कार्यशैलीची आणि त्यांच्या राजकीय भूमिकेची ओळख या चिन्हाशी जोडली गेली होती. त्याच घड्याळामुळे त्यांच्या पार्थिवाची ओळख पटणे, हा केवळ योगायोग नसून नियतीचा एक क्रूर आणि अस्वस्थ करणारा संकेत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे, विमानातील काही महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या तडाख्यातूनही सहिसलामत सापडली आहेत, यामुळे तपास यंत्रणेला मदत होण्याची शक्यता आहे.

COMMENTS