राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, विरोधी पक्ष सदस्यांच्या संदर्भात टिप्पणी करून नाराज
राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, विरोधी पक्ष सदस्यांच्या संदर्भात टिप्पणी करून नाराजी व्यक्त केली. सभागृहात जयंत चौधरी हे आरएलडी चे नेते बोलत असताना, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जयंत चौधरी यांना बोलू देण्याच्या संधी संदर्भात आक्षेप घेतला. सभागृहाच्या कोणत्याही नियमानुसार अशा पद्धतीने बोलू देणे, हे उचित नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले; परंतु, याच मुद्द्यावर सर्वात शेवटी जगदीप धनखड यांनी, आक्षेप घेत विरोधी पक्षांवर आणि त्यांच्या सदस्यांना एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसे पाहिले तर धनखड हे राज्यसभेचे सभापती या नात्याने कोणत्याही कार्यपद्धतीत तटस्थ दिसले नाहीत. त्यांची वेळोवेळी झालेली वक्तव्य, त्यांनी घेतलेल्या भूमिका या केवळ पक्षीय नाही, तर, जातीग्रस्त देखील राहिली आहे. त्यांच्यावर झालेल्या टीकेच्या अनुषंगाने त्यांनी जाट समाजाच्या शेतकरी नेत्याला टारगेट करणं, इथपासून तर अनेक आरोप यापूर्वी केले. तीच मानसिकता पुन्हा जयंत चौधरी या प्रकरणात देखील दिसते. जयंत चौधरी हे दिवंगत आरएलडी नेते अजित सिंग यांचे पुत्र असून, भारताचे महिनाभराच्या काळासाठी पंतप्रधान राहिलेले चरण सिंग यांचे ते नातू आहेत. नुकताच चरणसिंग यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या अनुषंगाने कोणत्याही पक्षाने विरोधात भूमिका घेतली नाही. परंतु, हा पुरस्कार दिला गेल्यानंतर देशभरात एक मात्र चर्चा झाली की, भारतरत्न या पुरस्काराची खैरात राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली, असा आरोप झाला. सभागृहात या प्रकरणावर चर्चा अपेक्षित नव्हती. कारण, भारतरत्न पुरस्कार ज्यांना दिला गेला, त्यांचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले होते. त्यामुळे या विषयावर जयंत चौधरी यांना विशेष अधिकार देऊन बोलण्याची संधी सभापतींनी दिली, त्यावर विरोधी पक्ष नेत्यांना आक्षेप होता. मात्र, हा आक्षेप जातीय आक्षेपावर घेऊन जात जगदीप धनखड यांनी पुन्हा एकदा आपले जातीग्रस्त मानसिकतेचे प्रदर्शन केले. देशाच्या संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारची मानसिकता ठेवणे, आणि भूमिका घेणे हे लोकशाही व्यवस्थेत लाजिरवाणे आहे. आपण ज्या पदावर आहोत, त्या पदाची गरिमा टिकवून ठेवणे, हे आव्हान असताना त्या पदाची गरिमा तर सोडाच; परंतु, आपल्या जातीयतेचा अहंगंड हा अधिक प्रकटपणे समोर आणणं, ही प्रक्रिया सभापती धनखड यांनी अनेक वेळा सभागृहाच्या कामकाजातून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःच्या जातीच्या अनुषंगाने आपल्यावर टीका आणि टार्गेट केलं जात असल्याची जो आरोप केला होता, त्यावर देशभरातून टीका झाली होती. देशात त्यांच्यावर झालेल्या टीकेतून महिला मल्लांवर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात जगदीश धनखड यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली? त्यावेळी त्यांचा स्वाभिमान कसा दुखावला नाही, असे प्रतिप्रश्न करून त्यांना देशभरातून घेरण्यात आले होते. अधून मधून आपली जातीय मानसिकता प्रदर्शित करण्याची संधी सभापती जगदीप धनखड यांनी सोडलेली दिसत नाही. त्याची वारंवार प्रचिती ही देशवासीयांना येत राहिली. वास्तविक राज्यसभेचा शेवटचा दिवस असताना आणि यानंतर संसदेचे अधिवेशन हे नव्या संसदेतच होईल; म्हणजेच लोकसभेच्या आगामी निवडणुका नंतर संसदेचे अधिवेशन होईल! त्यामुळे अधिवेशनाची सांगता करताना सभापती म्हणून जगदीश धनखड यांनी सभागृहातल्या सर्व सदस्यांचा सन्मान राखणे गरजेचे होते. त्याऐवजी त्यांनी सभागृहात आपले आणि परक्याचा भेद करत आपली पक्षीय मानसिकता प्रकट करण्याबरोबरच, जातीग्रस्त मानसिकतेचेही प्रदर्शन केले. लोकशाहीत जी उच्चतम मूल्य प्रदर्शित झाली पाहिजे, त्याऐवजी त्यांनी विरोधी पक्ष सदस्यांचा अवमान करण्याची आणि त्यांच्यावर संशय घेण्याची जी भूमिका आपल्या वक्तव्यातून व्यक्त केली, ती निश्चितपणे लोकशाही व्यवस्थेच्या या सभागृहाच्या प्रमुखाला शोभणारी नाही! कारण, आजपर्यंत अशी परंपरा भारताच्या सभागृहात कधी दिसली नाही त्यामुळे धनखड यांची भूमिका ही जातीग्रस्त मानसिकतेची राहिल्याने, त्यांनी या संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणाला दिलेला संदेश, हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील जातीग्रस्त संदेश म्हणून पाहिला जाईल, यात कोणतीही शंका नाही!
COMMENTS