लोकशाही मूल्ये आणि जात-धर्माचे वाढते प्राबल्य

Homeताज्या बातम्यासंपादकीय

लोकशाही मूल्ये आणि जात-धर्माचे वाढते प्राबल्य

देशातील अलीकडच्या काही घटनांचे सुक्ष्म निरीक्षण केले असता, प्रजासत्ताक भारतात जात-धर्माचे प्राबल्य मोठया प्रमाणावर वाढत चालले आहे. 70-72 वर्षांची लोक

केरळ उत्तम उदाहरण
सोशल, सोसेल का?
घराणेशाहीला सर्वच पक्षांकडून उत्तेजन

देशातील अलीकडच्या काही घटनांचे सुक्ष्म निरीक्षण केले असता, प्रजासत्ताक भारतात जात-धर्माचे प्राबल्य मोठया प्रमाणावर वाढत चालले आहे. 70-72 वर्षांची लोकशाही असणार्‍या देशात अशी अराजकता का निर्माण होत आहे, याचा शोध घेण्याची खरी गरज आहे. भारताचा लढा स्वातंत्र्यांसाठी होता, लोकशाहीसाठी नव्हता. लोकशाही आपल्याला स्वातंत्र्याबरोबर भेट मिळाली आहे. त्यामुळे लोकशाहीचे मूल्ये आपण आजही आपल्या पिढयांपर्यंत पोहचू शकलो नाही. ती अजूनही झिरपलेली नाही. त्यामुळे लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आत्मपरीक्षण करून, लोकशाहीचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. लोकशाहीला समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव अपेक्षित आहे. तर लोकशाहीत भक्ती किंवा विभूतीपुजा म्हणजे अधःपतनाचा मार्गच असतो. आणि भारतीय राजकारणात ही विभूतीपुजेचे स्तोम मोठया प्रमाणात वाढत चालले आहे. विभूतीपुजेचे स्तोम वाढले की, हुकूमशाही वाढते. तोच प्रकार भारतीय लोकशाहीत दिसून येत आहे. संसदीय लोकशाहीचा वारसा जपत असतांना, आपल्या लोकशाहीपुढे अनेक धोके देखील आहेत. हजारो वर्षांपासून भारतीय समाजात गडद असलेली जातव्यवस्था ही भारतीय राजकारणातील एक अविभाज्य अंग बनली आहे. प्रामुख्याने हीच जातव्यवस्था लोकशाही राजकारणातील मोठा अडसर आहे. भारतीय राजकारण हे नेहमीच समाजकारणाला सोडून जातआधारित, धर्म, भाषिक मुद्दयावर आधारलेले असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. धर्म म्हणजे जीवनाचा मार्ग. व्यवहार्य जीवनाची संपूर्ण पद्धती घालून देणारे ते एक शास्त्र आहे. धर्मामुळे व्यक्तीच्या जीवनाला आवश्यक अशी श्रेष्ठ मूल्ये मिळतात. आणि या मूल्यांचे अनुसरण केले की व्यक्तीचे जीवन सुखकर होते. म्हणून धर्म हे जीवनाचे कृतीशास्त्र किंवा आचरणाचे शास्त्र आहे. मात्र राजकारणात समाजाच्या विकासाला महत्त्व असते. समाजविकासाला आवश्यक मूल्ये राजकारणात ठरवली जातात. जनतेशी संपर्क ठेऊन परस्पर सहकार्याने जीवन जगण्याची सुधारित शासनपद्धती राजकारणातून ठरवली जाते. राष्ट्रातील प्रत्येक नागरिक आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक विकसित होऊ शकेल अशी शासनयंत्रणा निर्माण करण्याचे काम राजकारणात होते. धर्मामध्ये व्यक्तीचा तर राजकारणात समाजाचा विचार होतो. समाज व राष्ट्र हे व्यक्ती व्यक्तीनी बनले जाते. आणि समाजाचे सुख किंवा राष्ट्राची शक्ती ही त्यात राहणार्या व्यक्तिच्या मनोरचनेवर, आचारविचारावर अवलंबून असते. म्हणून अनंत काळापासून धर्म व राजकारण यांचा घनिष्ट संबंध आला आहे. राजकारणात काही तत्वे लोकांच्या माथी मारायचे असेल तर, त्याला धर्माचा आधार दिला की ते सहज खपतात, त्याचा फायदा राजकारण करतांना होतो, हा राजकारण्यांचा आधार. त्यामुळे राजकारण करतांना वेळीवेळी धर्माचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. धर्माचा आधार घेतला, की चिकित्सा आडवी येत नाही. तर्कशुद्ध विचार गहाण पडतो. सत्य असो की असत्य, त्याला धर्माचा मुलामा चढवला जातो. आणि मग ते राजकारणी मतांसाठी धर्माला, जातीलाच लिलावात काढतात. या राजकारण्यांनी देशभरात धर्म, जात, भाषिक मुद्यांना नेहमीच खतपाणी घातले. त्यामुळे जात, धर्म, भाषा यांचे प्राबल्य वाढण्यास मदतच झाली. परिणामी प्रत्येक राजकीय सभेत, धर्म, भाषा, जात हा महत्वाचा मुद्दा गाजु लागला. भारतीय लोकशाहीमध्ये राजकीय व्यक्तींचे पीक मोठया प्रमाणात आले, आणि ते मोठया जमावाला नियत्रिंत करू लागले. त्यांची भाषा, त्यांचे विचार हे जनमानसात रूजु लागले, काही वेळेस त्यांच्या एककल्ली विचारसरणीमुळे चुकीचा विचार पध्दत समाजात फोफावत चालले. त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी आपल्या सोयीसाठी जातीचा, धर्माचा, भाषेचा आधार घेत राजकारणाला दिशा दिली, आणि सत्तेतील किंगमेकर बनत गेले. आणि आपले सत्तेतील स्थान कायम ठेवण्यासाठी त्याला जात-धर्माचे वलय निर्माण करण्यात आले. आणि याच वलयाला सर्वसामान्य माणूस भुलत आला आहे. त्याला विकासाशी काही घेणे देणे नाही. मात्र धर्म-जातीचा विषय निघाला की, तो उत्तेजित होतो, आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. ही भारतीयांची नस राजकारण्यांना चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे भारतीय राजकारण नेहमीच जात-धर्माभोवती फिरत राहते, आणि त्यातूनच राजकारणी देखील सतत जात-धर्मांचा प्रश्‍न तसाच तेवत ठेवतात.

COMMENTS