घरकाम करणार्या महिलांना दरमहा 1500 रूपये देणारमुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर ; 100 वीज युनिट मोफतची घोषणामुंबई ः राज्यात निवडणुका बिनव

घरकाम करणार्या महिलांना दरमहा 1500 रूपये देणार
मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर ; 100 वीज युनिट मोफतची घोषणा
मुंबई ः राज्यात निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी करत राज्यात लोकशाही संपली असून झुंडशाही सुरू असल्याची टीका केली. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेकडून संयुक्तपणे मुंबईसाठीचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. दादर येथील शिवसेना भवनात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा’ लोकांसमोर सादर केला. याआधी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या महापालिका उमेदवारांसमोर एक सविस्तर प्रेझेंटेशन सादर केले होते. सत्तेत आल्यानंतर मुंबईचा विकास कोणत्या दिशेने नेणार, याचा तपशीलवार आराखडा त्यात मांडण्यात आला होता. या प्रस्तावांना अंतिम मान्यता देत आज हा वचननामा अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आला.
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात जाऊ न देता, त्या मुंबईकरांच्या हितासाठी वापरण्याचा निर्धार वचननाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. शासकीय कर्मचारी, बेस्ट व पोलीस कर्मचारी, गिरणी कामगार यांना हक्काची घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांत किमान एक लाख मुंबईकरांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे.
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा असलेल्या बेस्ट सेवेत मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. बस तिकिटांचे दर कमी करून 5, 10, 15 आणि 20 रुपयांचा फ्लॅट दर लागू करण्याचा प्रस्ताव आहे. ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस आणि 900 डबल-डेकर इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील. विद्यार्थी आणि महिलांसाठी काही विशेष मार्गांवर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचेही आश्वासन आहे. मुंबईतील आरोग्य सुविधांचा विस्तार करत पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा मानस आहे. पालिका रुग्णालये व दवाखान्यांत जेनेरिक औषधांची उपलब्धता वाढवली जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी 24ु7 हेल्थ केअर कंट्रोल रूम, ‘हेल्थ टू होम’ सेवा आणि महापालिकेची स्वतंत्र रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार आहे. याशिवाय मुंबईचे स्वतःचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचाही संकल्प आहे.
घरकाम करणार्या महिलांसाठी मासिक स्वाभिमान निधी
घरकाम करणार्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दरमहा 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. कोळी समाजातील महिला विक्रेत्यांसाठी नोंदणी, अर्थसहाय्य आणि परवाना व्यवस्थेत सुलभता आणली जाईल. कष्टकरी मुंबईकरांसाठी अवघ्या 10 रुपयांत नाश्ता व जेवण देणार्या ‘मासाहेब किचन्स’ सुरू करण्यात येतील. महिलांच्या लहान मुलांसाठी दर्जेदार पाळणाघरे आणि दर दोन किलोमीटरवर स्वच्छ शौचालयांची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही : राज ठाकरे
पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधार्यांनी करावा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला.

COMMENTS