शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द करत बारामतीत दाखलपुणे ः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच पवार कुटुंबात

शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द करत बारामतीत दाखल
पुणे ः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच पवार कुटुंबात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी नियोजित असलेला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पवार आता पुन्हा बारामतीकडे जाणार असल्याचे समजते.
मंगळवारी सकाळी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसराला भेट दिली. ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या स्थळाची पाहणी करताना त्यांनी प्रस्तावित स्मृतीस्थळाबाबत विश्वस्त किरण गुजर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर पवार दिल्लीला रवाना होणार होते, मात्र ऐनवेळी दौरा रद्द करण्यात आला. पुण्यामार्गे ते पुन्हा बारामतीत जाण्याची शक्यता असून, या निर्णयामागील कारणाबाबत पक्षात गोपनीयता पाळली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांना संधी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ही जागा उरलेल्या कालावधीसाठी भरायची की सहा वर्षांच्या पूर्ण कार्यकाळाची संधी द्यायची, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. 2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार यांना प्रथमच मोठ्या घटनात्मक जबाबदारीची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी कुटुंबातील पुढील पिढी पुढे येताना दिसत आहे. पक्षातील माहितीनुसार, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासन आणि राजकीय समन्वयाची जबाबदारी सांभाळतील. पार्थ पवार हे राज्यसभेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे प्रतिनिधित्व करतील, तर जय पवार संघटनात्मक कामकाज आणि बारामतीतील स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

COMMENTS