Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव

ट्रॅव्हल्सच्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू प्रवाशांचा झाला कोळसा ः ओळख पटवणे अवघड

बुलडाणा/प्रतिनिधी ः नागपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसचा अपघात झाला असून, या अपघातानंतर बसला ल

निळवंडेतून पाणी सोडण्यासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच
जिन्यावरून पडून पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू तर एक जखमी | LOKNews24
कवठेत शॉटसर्किटने आग लागून पन्नास गुंटे ऊस जळुन खाक; अडीच लाखाचे नुकसान

बुलडाणा/प्रतिनिधी ः नागपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसचा अपघात झाला असून, या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

समृद्धी महामार्गावरील झालेल्या अपघातानंतर लागलेली आग इतकी भीषण होती की, त्यातून ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना बाहेर पडणे कठीण झाले होते. यात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून, ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला आहे. या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या दोन प्रवाशांनी आपबिती सांगितली. ते प्रवासी 19 आणि 20 नंतबरच्या सीटवर बसलेले होते, अपघातानंतर या दोन प्रवाशांनी काच फोडून बाहेर आले आणि त्यांनी कसाबसा जीव वाचवला. याविषी आपबिती सांगतांना प्रवासी म्हणाले की, नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसमध्ये आम्ही बसलो होतो. रात्री आमचे जेवण झाले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही बस उलटली. बस उलटल्यानंतर बसने पेट घेतला. आम्ही 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. वरची काचेची खिडकी आम्ही तोडली आणि बाहेर पडलो. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली. अशीही माहिती या प्रवाशांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस आले, अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली असेही या दोन प्रवाशांनी सांगितले. साधारण रात्री दीडच्या सुमारास या बसचा अपघात झाला. या बसमध्ये 33 प्रवासी होते. 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. इतर प्रवासी वाचले आहेत. बस उलटल्यानंतर या बसने पेट घेतला. डिझेल टँक फुटून आग लागली आणि वाढली त्यामुळे बसमधले प्रवासी होरपळले. काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडले असेही पोलिसांनी सांगितले. बसच्या केबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. एकजण झोपला होता तर दुसरा गाडी चालवत होता. एक चालक बचावला असून दुसर्‍याचा मृत्यू झाला अशीही माहिती पोलिसांनी दिली.

अपघातातील मृतांची नावे –
निखिल पाथे (यवतमाळ)
सृजन सोनोने (यवतमाळ)
कैलास गंगावणे (शिरूर, पुणे)
कांचन गंगावणे (शिरूर, पुणे)
सई गंगावणे (शिरूर, पुणे)
अवंती पोहनीकर, वर्धा
संजीवनी गोटे, हिंगणघाट
प्रथमेश खोडे, वर्धा
श्रेया वंजारी, वर्धा
राधिका खडसे, वर्धा
तेजस पोकळे, वर्धा
तनिषा तायडे, वर्धा
शोभा वनकर, वर्धा
वृषाली वनकर, वर्धा
ओवी वनकर, वर्धा
करण बुधबावरे, सेलू
राजेश्री गांडोळे, आर्वी

मृतदेहांची डीएनए टेस्टिंग करणार ः फडणवीस – या अपघातानंतर लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या अनेक प्रवाशांचा कोळसा झाला आहे, त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे अवघड असून, यासाठी मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाईल त्यासंदर्भातले निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर आहे आम्ही त्याची चौकशी करत आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. जर घरातले लोक मृतदेहाची ओळख पटवू शकले तर पोस्टमॉर्टेमनंतर त्यांना मृतदेह देण्यात येतील. ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार आहे. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारचे आतातरी डोळे उघडतील ः उद्धव ठाकरे – गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी अपघातामध्ये मरण पावले आहेत, सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलडाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक – समृद्धी महामार्गावरील अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची, तर जखमींना 50 हजारांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले आहे. अपघातातील ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, असे ट्वीट पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने केले आहे.

प्रवासी नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील – समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेले प्रवासी आणि जखमी हे यवतमाळ, नागपूर आणि वर्धा येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. बसचा चालक आणि क्लिनरही यवतमाळचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा अपघात झाल्यानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वाहतूक पोलिसांनाही पाचारण केले. वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवली असून बस बाजूला करण्याचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या अपघातातील मृतांची ओळख पटवणे मुश्कील झाले आहे. कारण मृतांचे चेहरे जळून गेले आहेत. त्यांच्या अंगावरचे कपडेही जळून गेले आहेत. मृतांचे सामानही जळून खाक झाले आहे. कोणाताही आयडी प्रूफ शिल्लक नसल्याने या मृतांची ओळख पटणे मुश्किल झाले आहे. ट्रॅव्हल्स कंपनीकडील प्रवाशांची यादी घेऊन या मृतांची ओळख पटवली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पाचारण करण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS