माणूस हा पृथ्वीचा आणि तिच्यावरील सर्व तऱ्हेच्या सजीव आणि निर्जीव साधन संपत्तीचा शत्रू आहे. या माणसाने आपल्या चैनीसाठी या सृष्टीतील अनेक जीवांना ठार क
माणूस हा पृथ्वीचा आणि तिच्यावरील सर्व तऱ्हेच्या सजीव आणि निर्जीव साधन संपत्तीचा शत्रू आहे. या माणसाने आपल्या चैनीसाठी या सृष्टीतील अनेक जीवांना ठार केलेले आहे. एकीकडे अशा जीवांना पवित्र मानायचे तर दुसरीकडे त्याला ठार करायचे. सापाच्या बाबतीत सांगायचे तर एकीकडे मूर्तीचे पूजन करायचे तर दुसरीकडे जिवंत साप निघाला की, त्याला ठार मारायचे. तसेच मोराच्याही बाबतीत. फरक एवढाच की, सापाला भीतीपोटी मारायचे तर मोराला खाण्यासाठी. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी. 26 जानेवारी 1963 रोजी मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून भारत सरकारने दर्जा दिला. भारताच्या शेजारील असलेल्या म्यानमार आणि श्रीलंका या देशाचा देखील राष्ट्रीय पक्षी हा मोरच. भारताच्या सर्व भागांमध्ये तो आढळतो. तो पक्षांचा राजा आणि दिसायला खूप सुंदर, चमकदार. त्याला विविध धर्मात पावित्र्य बहाल करण्यात आलं आहे. हा आपला राष्ट्रीय पक्षी माणसांकडूनच आता संकटात सापडला आहे. भारत सरकारने 1972 साली “मोर संरक्षण कायदा” मोरांच्या सुरक्षेसाठी तयार केला. हा कायदा झाला खरा, पण त्याच्या अंमलबजावणीचे काय? काल दोन मोरांसह सात लांढोऱ्यांची शिकार करणारा शिकारी वनविभागाच्या जाळ्यात मुद्देमालासह रंगेहाथ अडकला. फासाच्या साह्याने मोरांची शिकार करणाऱ्या गोरख राजेंद्र शिंदे ( सध्या रा. रेठरे बुद्रुक ता.कराड. मूळ रा. इटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) याला वनविभागाने शिकार करून मारलेले दोन मोर व सात लांढोरे यांच्यासह ताब्यात घेतले. यावरून आपला राष्ट्रीय पक्षी सुरक्षित नाही हेच सिद्ध होते. हे असे का होते याचा ऊहापोह करणे क्रमप्राप्त.
मोराच्या अधिवासात वाघ, कोल्हा व रानमांजर हे नैसर्गिक शत्रू. वाघ व बिबट्या यांसारखे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडल्याचे दिसताच मोर ओरडून तो मोरांसह इतर प्राण्यांना सावध करतो. आपल्यावर हल्ला होणार असे दिसताच मोर वेगात पळतात. कीटकनाशके, शिकाऱ्याने विष लावून टाकलेले धान्य खाल्ल्याने तसेच उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मोरांचे मृत्यू आपल्याकडे होतात. भारतात मोरांची शिकार करणे हा दखलपात्र गुन्हा. पण इथं कायदा जसा केला जातो तसा तो राबवला जात नाही. त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी कितीही कायदे केले तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. विशेष म्हणजे वनविभाग आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या कर्तृत्वापासून अनभिज्ञ असतात. त्याला काही वनअधिकारी अपवाद आहेत. त्यापैकी विभागीय वनअधिकारी म्हणून काम केलेले आणि नुकतेच बढतीची निवड घेऊन गेलेले अमोल सातपुते (उप वनसंरक्षक प्रादेशिक जुन्नर) हे एक नाव. त्यांचे काम अफलातूनच. त्यांनी जे काही केले ते दाखलपात्रच. तसेच आपल्याकडे पर्यावरण प्रेमी, पक्षीमित्र, प्राणीमित्र यांचे काम उल्लेखनीय आहे. बीड जिल्ह्यात ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र’ च्या माध्यमातून काम करणारे सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे हे त्याचे उत्तम उदाहरण. या दाम्पत्यांनी त्यांच्या भागात असे काम उभे केले आहे की, तिथे शिकार करण्याची कुणाची मजल होत नाही. असे काम उभे करण्यासाठी आपल्या राज्यातील वन्यजीव विभाग आणि वनविभागाने त्यांची प्रेरणा घेणे आवश्यक. तेव्हा, कुठे वन्यजीव संवर्धनाची खरी चळवळ या राज्यात उदयाला येऊ शकते.
अनेक धार्मिक कथांमध्ये मोराला खूप महत्व दिले आहे. भगवा श्रीकृष्ण यांच्या डोक्यावर मुकुटामध्ये लावलेला मोराचा पिसारा (पंख) हा मोर पक्ष्याचे महत्व दाखवततो. हिंदू धर्मात मोर पक्ष्याचा संबंध हा देवी आणि देवतांशी आहे. भगवान विष्णू आणि कार्तिकेय यांचे वाहन हे मोरच. अनेक जन आपल्या घरात किवा देवघरात मोराचा पिसारा ठेवतात. पण हा सर्व दिखावा आणि भाकीत. त्याच्या संवर्धनासाठी निर्णायक काय केले पाहिजे याचे या कथाकारांना किंवा इतरांना याचे भान नाही. सुंदर आणि मनमोहक पिसाऱ्यामुळे जगभरात मोरांची होते. तशी ती सर्वच वन्यजीवांची होते. महाराष्ट्रात मोरांची शिकारी होत असल्यामुळे मोरांची प्रजात नष्ट होत चालली आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 हा वन्यजीवांची अवैध शिकार आणि त्यांच्या मांस आणि कातडीचा व्यापार रोखण्याच्या उद्देशाने 1972 मध्ये भारत सरकारने पारित केला होता. 2003 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली आणि त्याला भारतीय वन्यजीव संरक्षण (सुधारणा) कायदा 2002 असे नाव देण्यात आले, ज्या अंतर्गत शिक्षा आणि दंड अधिक कडक करण्यात आला आहे. कायदा वन्यजीवांना संपूर्ण संरक्षण प्रदान करते. या अंतर्गत गुन्ह्यांसाठी सर्वोच्च शिक्षा विहित केलेली. अनुसूची-३ आणि अनुसूची-४ मध्ये देखील संरक्षण प्रदान करत आहेत, परंतु दंड खूपच कमी. शेड्यूल-5 मध्ये ज्या प्राण्यांची शिकार केली जाऊ शकते. त्यांच्यासाठी तरतूद केलेली. पण नुसता कायदा करून काय उपयोग. तो सर्वानी पाळला पाहिजे. कायदा करणारे आपल्याकडे कायदा मोडतात. कायद्याचे ज्ञान असूनही अनेकजण तो पाळत नाहीत. आपल्या देशात राजकारणातले, सिनेमातले अनेकजण प्राण्याच्या शिकारीमुळे गजाआड जाऊन आलेले आहे. आपल्या मोर या राष्ट्रीय पक्षाला वाचवण्यासाठी राज्यात आणि देशात एक लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. नसता मोरांचा माळढोक व्हायला वेळ लागणार नाही. मोर जगावा, तो ओरडावा, मनसोक्त नाचवा आणि नाचरे मोरा आंब्याच्या वनात… हे गीतातील मोरांचे भावदर्शन येणाऱ्या अनेक पिढ्यांची पाहावे ही अपेक्षा. दैनिक लोकमंथन या विषयावर नुसते लिहिणार नाही तर प्रत्यक्षात कामही करेल या खात्रीसह जर कोणी वन्यप्राण्यांची शिकार करत असेल तर शिकार करणाऱ्यांची माहिती हॅलो फॉरेस्ट 1926 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी ही अपेक्षा.
COMMENTS