नवी दिल्ली ः अचानक आलेल्या वादळ आणि पावसाने देशातील चार राज्यांमध्ये विध्वंस निर्माण केला. चार राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम आणि मणिप
नवी दिल्ली ः अचानक आलेल्या वादळ आणि पावसाने देशातील चार राज्यांमध्ये विध्वंस निर्माण केला. चार राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पश्चिम बंगाल या राज्यातील जलपाईगुडी येथे पाच जणांचा मृत्यू झाला. तर 100 जण जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसामुळे आसाममधील गुवाहाटी येथील गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला. काही काळ विमान वाहतूक बंद करण्यात आली. सहा उड्डाणे वळवावी लागली. मिझोराममधील चंफई जिल्ह्यातील लुंगटान गावात चर्चची इमारत कोसळली. आयझॉल जिल्ह्यातील सियालसुक येथे आणखी एका चर्चच्या इमारतीचे नुकसान झाले. याशिवाय काही घरांचेही अंशत: नुकसान झाले आहे. दुसरीकडे, मणिपूरच्या थौबल आणि खोंगजोम भागात अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरांच्या कौलाचे छत उडून गेले. या घटनेबद्दल बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल शोक. मी अधिकार्यांशी बोललो आहे आणि त्यांना अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यास सांगितले आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मैनागुरीतील अनेक भागात जोरदार वार्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब पडले, असे अधिकार्यांनी सांगितले. सर्वाधिक प्रभावित भागात राजारहाट, बरनीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि साप्तीबारी यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी रात्री जलपाईगुडी आणि सिलीगुडी येथे पोहोचल्या. सिलीगुडीतील बागडोगरा विमानतळावर झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्या म्हणाल्या, या आपत्तीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासन घटनास्थळी असून आवश्यक ती मदत पुरवत आहे. पीडितांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
COMMENTS