कर्नाटकात काॅंग्रेसचे सरकार शपथविधी सोहळा संपन्न करून सत्तेवर आल्याआल्याच सभागृह शुध्दीकरण करण्याचे काम उरकून घेतले. अलीकडे असे प्रकार वाढीस लागल
कर्नाटकात काॅंग्रेसचे सरकार शपथविधी सोहळा संपन्न करून सत्तेवर आल्याआल्याच सभागृह शुध्दीकरण करण्याचे काम उरकून घेतले. अलीकडे असे प्रकार वाढीस लागले आहेत. उत्तर प्रदेशात आदित्यनाथ योगींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर येताच असेच शुध्दीकरण केले होते. या शुध्दीकरण करण्यातून नेमके काय साध्य केले जाते, याचा विचार केला तर सामाजिक विषमतेचे आणि प्रस्थापित समाजव्यवस्थेचा पायाच मजबूत केला जात आहे. एका बाजूला गोमूत्र हे प्रतिष्ठेचे करण्याची संस्कृती संघ-भाजप च्या विचारांतून वर्धिष्णू केली जात असताना, सामाजिक पातळीवर त्याच बाबींचा स्विकार राजकीय पक्ष करित असतील तर, सामाजिक विषमतेचा पाया आणि सांस्कृतिक अमानवीय मूल्य असणारी प्रतीके वाढीस लावण्याची संस्कृती राजकीय पक्ष वाढीस लावत आहेत, असे म्हणावे लागेल. अशा अवस्थेत संघ प्रणित संस्कृतीपेक्षा वेगळी संस्कृती स्वीकारली जात नसल्याच्या स्थितीवर शिक्कामोर्तब केले जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याठिकाणी दोन उदाहरणे आपण दिली. पहिले, समाजवादी पक्षाचे म्हणजे अखिलेश सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकार पराभूत झाल्यानंतर योगी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गोमूत्र शिंपडून आणि संपूर्ण फर्निचर बदलून विधीमंडळाचे शुध्दीकरण केले होते. वास्तविक, अखिलेश यादव यांचे सरकार हे ओबींसीं नेतृत्वाचे सरकार होते. ओबीसी समाजाला धर्मशास्त्राच्या चातुर्वर्ण्यग्रस्त रचनेत शूद्रांचा दर्जा आहे. त्यामुळे, योगी यांनी केलेले शुध्दीकरण हे सामाजिक पातळीवर होते की, राजकीय पातळीवर याचा जाहीर जाब विचारला गेला नाही. संविधानिक सभागृहांचे अशा प्रकारचे शुध्दीकरण करणे, हा सामाजिक, सांस्कृतिक आणि त्याहीपेक्षा संविधानिक पातळीवर गुन्हा आहे. परंतु, अशा प्रकारचे गुन्हे सर्रासपणे केले जात आहेत, ही बाब चिंताजनक आणि तितकीच निंदनीय आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार गेल्यानंतर नवनिर्वाचित काॅंग्रेस सरकारने तोच पायंडा आणणे म्हणजे सामाजिकदृष्ट्या संघाची विचारसरणी स्विकारण्याचा भाग आहे. दोन राजकीय पक्षांमध्ये जर, अशा प्रकारची सांस्कृतिक समानता असेल तर ती सामाजिकदृष्ट्या अतिशय चिंतेची बाब म्हणावी लागेल. गोमूत्र आणि त्या अनुषंगाने दररोज भारतात जे दावे मुर्खांकडून केले जातात, त्या दाव्यांना पुष्टी देण्याचे कामच गोमूत्र शिंपडून केल्या जाणाऱ्या शुध्दीकरणातून केले जात आहे, असे म्हणण्यावाचून प्रत्यवाय राहत नाही. कर्नाटक काॅंग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीच्या भाजप सरकारने १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळे गोमूत्र शिंपडून शुध्दीकरण करण्याचा दावा केला असला तरी शुध्दीकरण करण्याच्या पारंपारिक संकल्पना बदलल्या गेल्या पाहिजेत. गोमूत्र हे प्रस्थापित व्यवस्थेतील सामाजिक विषमतेचे अमानवी प्रतिक आहे, म्हणून त्याचा आम्ही निषेध आणि निंदा करतो. काॅंग्रेसने त्यांची सामाजिक विचारसरणी शुध्दीवर असल्यासारखी ठेवावी किमान एवढे भान त्यांना यावे. या देशातील सामाजिक भान ठेवूनच कोणताही बदल घडविण्याचा प्रयत्न करायला हवा. वर्णव्यवस्था आणि त्याची प्रतिके प्रतिष्ठेची करण्याचा कोणताही प्रयत्न हा विरोधाभास असेल, याची संबंधितांनी खात्री बाळगावी. त्यामुळे, असे प्रकार होवू नये, हेच बेहत्तर.
COMMENTS